Ramdas Kadam in Shivsena Dasara Melawa: दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडला असून दुसरीकडे नेस्को सेंटरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यांच्या निमित्ताने एकमेकांवर राजकीय आरोप व टोलेबाजी पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

रामदास कदम यांनी यावेळी आपल्या भाषणात मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “तुम्ही ३० वर्षं मुंबईत फक्त टक्क्यांचं काम केलं. दोनवेळा मला बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईसाठी विधानपरिषद दिली. पण मला मुंबई महानगर पालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता. आमचा महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता ही आमची अवस्था होती. मुंबई पालिकेची निवडणूक येईल तेव्हा मी बोलेन. पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव राजकीय वारसा म्हणून घेण्याचा अधिकार आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांना केली ‘ही’ विनंती

यावेळी रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळच्या काही घडामोडींचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस ठेवण्यावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबतही त्यांनी मोठं विधान केलं आहे.

“माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?” असं रामदास कदम म्हणाले.

बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले?

बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. “कुणीतरी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या हातांचे ठसे घेतले गेले. हे ठसे कशासाठी घेतले? मातोश्रीमध्ये तेव्हा सगळी चर्चा चालली होती. माझी आणखीही एक विनंती आहे की बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र कुणी केलं? कधी झालं? त्यात सही कुणाची होती? याची सगळी माहिती काढा”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी ज्येष्ठ नेत्यांना राजकीय जीवनातून संपवल्याचा आरोप

दरम्यान, आपल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवल्याचा गंभीर आरोप केला. “तुम्ही आम्हाला काय शिकवताय? आम्ही शिवसेना मोठी केली. तुरुंगवास आम्ही भोगलाय. तुम्ही मनोहर जोशींना संपवलंत. तुम्ही गजानन कीर्तीकरांना संपवलंत. तुम्ही दिवाकर रावतेंना संपवलंत. तुम्ही रामदास कदमला संपवलंत. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे लागलात. नेमकं तुम्हाला काय हवं होतं? ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना ५० वर्षं साथ दिली, त्या नेत्यांना बाळासाहेब गेल्यानंतर संपवण्याचा विडाच तुम्ही उचलला”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या मेळाव्यात माझं भाषण व्हायचं. ज्या वर्षी बाळासाहेब ठाकरे गेले, त्या वर्षापासून शिवाजी पार्कवरचं माझं भाषण बंद झालं. का रे बाबांनो? काय झालं? गुलाबराव पाटील, रामदास कदम यांच्या भाषणांना टाळ्या मिळतात. त्यांना भाषण देऊ नका. तुम्हाला भीती कसली वाटतेय?” असा दावाही त्यांनी भाषणात केला.