Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death Controversy : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत केलेल्या एका मोठ्या दाव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यासाठी त्यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवलं होतं, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या आरोपानंतर आज (४ ऑक्टोबर) रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का? याची सीबीआय चौकशी करा’, अशी मागणी करत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लेखी पत्र लिहिणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर

“अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं. मी दसरा मेळाव्यात बोललो होतो की त्यामध्ये मी डॉक्टरांचा संदर्भ दिला होता. कारण ते डॉक्टर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करत होते. मग त्या डॉक्टरांवर देखील अनिल परब हे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत का? पैशांसाठी, कारण त्यांच्याकडे आता पैसे कमी पडले असतील”, असं रामदास कदम यांनी म्हटलं.

‘सीबीआयची चौकशी करा…’

“मी आता निर्णय घेतला आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खरंच मातोश्रीवर ठेवलं होतं का? याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे. तसेच सीबीआय चौकशी करण्याची लेखी मागणी मी करणार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबांनी न्यायालयात जावं. अनिल परबांना आपण काय बोलतो याचं भान असावं. आम्ही सर्व नेते मातोश्रीपासून लांब झालो आणि त्यानंतर ते मातोश्रीचे मालक झाले का? अन्यथा अनिल परब कोण होते? मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यू पत्र जे झालं, त्यामध्ये यांचाही काही संबंध असेल”, असं रामदास कदम म्हणाले.

अनिल परब काय म्हणाले होते?

“रामदास कदम यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केला आहे. याला नीच हाच एक शब्द लागू होतो. या आरोपांचं उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नव्हती. कारण पोरीबाळी नाचवून आणि त्यांची दलाली खाऊन बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही. पण आमच्या दैवताच्या म्हणजेच बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे मी उत्तर देतो.” असं अनिल परब म्हणाले आणि त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर दिलं.