लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पाचवी यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या सोलापूरची निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते असा सामना रंगणार आहे. माढा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लोकसभेच्या मैदानात आहेत. आज (२५ मार्च) राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मी आणि राम सातपुते एकाच विमानाने दिल्लीला जाणार असल्याची मिश्किल टिप्पणी केली.

रणजितसिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले?

“देश मागील वर्षांपासून श्रीरामाची वाट पाहत होता. त्यामुळे यावेळी सर्वच ठिकाणी श्रीरामाचा जय होताना दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरसाठी चांगला कार्यकर्ता, विद्यमान आमदार उमेदवार म्हणून दिला. राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवणारच नाही तर सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करतील. त्यांच्यामध्ये ती क्षमता असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोलापूरसाठी निवडले. त्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या विमानतळाचा प्रश्न, रेल्वेच्या प्रश्नासह रखडलेला विकास प्रगतीपथावर येईल. राम सातपुते आणि मी आम्ही दोघेही एकत्र, एका ठिकाणावरून, एका जिल्ह्यातून, एका विमानाने दिल्लीला जाताने दिसू”, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

हेही वाचा : प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, “धर्म आणि जातींमध्ये फूट पाडून इतकी वर्षे…”

राम सातपुते काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाचे खासदार म्हणून पुन्हा एकदा निवडून जातील. सोलापूरमध्ये देखील भाजपाचे कमळ फुलेल. सोलापूरची जनता जिल्ह्यातून भाजपाची दोन कमळाची फुले दिल्लीला निश्चित पाठवेल”, असे राम सातपुते म्हणाले.

प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित राम सातपुते यांना आव्हान दिले. “सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत आपले स्वागत आहे. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे स्वागत करते. तसेच तुम्हाला उमेदवारीच्या शुभेच्छा देते. लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू”, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांनीही लागलीच उत्तर दिले आहे. “मी २०१९ पासून माळशिरस मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो. मी आमदार झाल्यापासून आजपर्यंत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत असून विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून एवढी वर्षे कुणी राजकारण केले, हे सोलापूरच्या नव्हे तर देशाच्या जनतेने ओळखले आहे”, असे प्रत्युत्तर राम सातपुते यांनी दिले आहे.