रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी मत्स्य विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील ३१९ अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवीला. २५ एकर जमिनीवरील बांधकामे बुलडोजरच्या सहाय्याने हटविण्यास सकाळी ९ वाजल्या पासून सुरुवात करण्यात आली. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेले आहे. मात्र आता या बंदराच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाकडून त्याबाबत निविदाही काढण्यात आली आहे. मात्र येथील अनधिकृत बांधकामे या बंदराच्या विकासाला अडथळा ठरत असल्याने ही बांधकामे हटविण्याच्या नोटीसा संबंधित लोकांना देण्यात आल्या होत्या. मात्र ही बांधकामे हटविण्यासाठी वाढीव दोन दिवसांची आणखी मुदत देण्यात आली होती. ती सोमवारी संपल्यावर जिल्हा प्रशासनाने या बांधकामांवर बुलडोजर फिरवला. पक्की बांधकामे सकाळी ९ वाजता बुलडोजरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाई नंतर मिरकरवाडा बंदराने आता मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.

मिरकरवाडा बंदर परिसरात जवळजवळ मत्स्य विभागाची २५ एकर जमीन असून या जमिनीमध्ये मलपी येथील बंदरापेक्षाही अत्याधुनिक सुसज्ज अशा बंदराचा विकास होणार आहे. यासाठी मिरकरवाडा बंदराच्या विकासाचा मत्स्य व्यवसाय विभागाकडून आराखडा ही तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुढील काही वर्षांतच मिरकरवाडा बंदराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात तसेच मत्स्य विभागाचे कोकण उपसंचालक भादुले यांच्या उपस्थितील मिरकरवाडा बंदर साफ करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक धंनजय कुलकर्णी यांनी मिरकरवाडा येथे जावून परिस्थितीची पहाणी केली. सायंकाळपर्यत येथील बांधकामे हटविण्याचे काम सुरु होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरकरवाडा बंदर परिसरात अनेक मच्छिमार व्यावसायिकांनी मच्छी सुकविण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी अनधिकृत बांधकामे उभारली होती. मात्र मत्स्य खात्याकडून आता या बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याने शासनाने मच्छी सुकविणे आणि साठवण करण्यासाठी दुस-या ठिकाणी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांकडून मागणी करण्यात येत आहे.