सरत्या वर्षांला निरोप व नवीन वषार्ंची सुरूवात साईदर्शनाने करण्यासाठी शिर्डीत बुधवारी भक्तांची विक्रमी गर्दी झाली. नियोजन कोलमडून पडल्याने दर्शनरांगेत भक्तांची रेटारेटी झाल्याने वृध्द, महिला, लहान मुलांचे चांगलेच हाल झाले. सुरक्षा व्यावस्थाही कोलमडून पडल्याने संस्थान प्रशासन हातबल झाले होते.
साईभक्तांनी मंगळवारी रात्री बाराच्या ठोक्याला साईनामाचा गजर करीत नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत केले. स्थानिक नागरिकांसह भक्तांनीही रात्री बारा वाजता एकच गर्दी केली. समाधीमंदिर रात्रभर उघडे असूनही दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागला. दर्शनरांगा शहराच्या बाहेर दोन ते तीन किलोमीटपर्यंत गेल्या होत्या. वाहतुकीचे नियंत्रण करण्यातही पोलिसांच्या वाहतूक शाखेला अपयश आल्याने सर्वत्र वाहतुकीचीही कोंडी झाली होती.
गर्दीचा फायदा घेत अनेक पाकिटमारांनी भक्तांचे खिसे साफ केले. अनेक भक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन न मिळाल्याने कळसाचे दर्शन घेऊन परत फिरणेच पंसत केले. गर्दीच्या कालावधीत शिर्डी नगरपंचायतीचे प्रशासन कुठेही दिसून आले नाही. शिर्डीतील घाणीनेही भक्तांना हैराण केले. खासगी आराम बस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनीही दर वाढवून भक्तांची लूट केली.
शिवराजसिंह चौहान पायीच!  
भक्तांना गर्दीच्याकाळात त्रास होवू नये म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या सरकारी वाहनांचा ताफा शिर्डीतील शासकीय विश्रामगृहावर ठेवून विश्रागृहातून मंदिर परिसरात कुटुंबीयांसमवेत पायी चालत येऊन माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. आरतीनंतरही चौहान पायी चालक विश्रामगृहाकडे गेले. मध्य प्रदेशातील अनेक भक्तांशी त्यांनी सुरक्षेचा बडेजाव न करता हस्तांदोलन केले.