धाराशिव – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाची शासनाकडून तत्काळ दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजाने बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. धाराशिव शहरात मराठा समाजातील युवकांनी मोटारसायकल रॅली काढून शहरवासीयांना बंदची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून आंदोलनाला समर्थन दिले. हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन असताना काहींनी बसवर दगडफेक केल्याचे समोर आले.
कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसेच सगेसोयरेंचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते, परंतु त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगत त्यांना सरकारचा शासन अध्यादेश दिला. या अध्यादेशाची अंमलबजाणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी तरूणांनी मोटारसायकलवर रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर-धाराशिव या बसवर आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. दरम्यान समाजातील तरुणांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. धाराशिवसह तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, भूम, परंडा आणि कळंब तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून कडकडीत बंदचे आवाहन केले होते.
हेही वाचा – ‘आधी बिहारची निवडणूक, मगच खासदारकीचा विचार…’ भाजपच्या मोठ्या नेत्याची स्पष्टोक्ती
हेही वाचा – मोठी बातमी: राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल यांना उमेदवारी जाहीर
आमदार पाटलांच्या घरासमोर ठिय्या
मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी सत्ताधारी पक्षातील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. मराठा आंदोलकांनी आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या घराचे गेट लावून घेत हे आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी आणि सरकारला आरक्षणासाठी भाग पाडण्यासाठी सत्ताधारी आमदार महोदयांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.