त्या अग्रलेखाची जबाबदारी कुणाची? संजय राऊत म्हणतात..

नारायण राणेंवरील अग्रलेखावरुन भाजपाने सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे

Saamna editorial rashmi thackeray shiv sena mp sanjay raut narayan rane

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब नाशिकमधील शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेकडून नारायण राणे तसेच भाजपाविरोधात आंदोलने करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी दगडफेकही आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. त्यानंतर बुधवारी भाजपाने सामनाच्या संपादिका आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत उत्तर दिले आहे.

शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरेंविरोधात दाखल केली असून यामध्ये नाशिक महानगरपालिकेमधील शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचंही नाव आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये बुधवारी (२५ ऑगस्ट) राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. हे शब्द म्हणजे राणेंना संविधानानुसार देण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री पदाचा अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. तसेच बोरस्ते यांनी या लेखाचे पोस्टर बनवून ते जागोजागी लावून बदनामी केल्याप्रकरणी रश्मी ठाकरे आणि बोरस्तेंविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.

आपल्या संपादकीयवरुन संपादक रश्मी ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात बोलले जात आहे असे पत्रकाराने विचारले तेव्हा, “मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्या संपादकीयाची जबाबदारी संजय राऊत यांची आहे,” असे राऊत यांनी म्हटले आहे.

सामनाच्या अग्रलेखामध्ये नक्की काय म्हटलं आहे?

बुधवारी ‘सामना’तील अग्रलेखातून टीका करताना राणेंचा उल्लेख ‘भोकं पडलेला फुगा’ असा करण्यात आला. “नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,” असा टोला या लेखाच्या सुरुवातीलाच लगावण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saamna editorial rashmi thackeray shiv sena mp sanjay raut narayan rane abn

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या