कोल्हापूर : राज्य शासनाचा गोवंश हत्या बंदी कायदा हा तर गोपालक हत्या कायदा बनला आहे, अशा शब्दांत माजी कृषी राज्य मंत्री, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सरकारला घरचा आहेर दिला. गोरक्षक नव्हे तर खंडणीखोर , गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांशी नांगराचा फाळ हातात घेऊन लढू, असा सणसणीत इशारा देवून त्यांनी नांगराचा फाळ हाती घेऊन खंडणीखोर गोरक्षकांचा बंदोबस्त करणार, असा सज्जड दम गोरक्षकांना भरला.
आमदार खोत म्हणाले की, राज्य सरकारने आणलेला गोवंश हत्या बंदी कायदा हा गोपालक हत्या बंदी कायदा बनला आहे. कारण आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाई, कमी दूध देणाऱ्या जर्सी गाई यांचे काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. शेतकऱ्याकडे दोन जनावरे असतील आणि त्यांच्यामध्ये एक जनावर भाकड निघाले तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही. जर्सी गाईला गोर्या (एक व्याधी) झाला तरी तो औतालाही चालत नाही.
एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करत आहेत. त्यावर एक- दोन अनुत्पादक जनावर भार म्हणून पडली तर तो धंदा तोट्याचा होत आहे. दुसरीकडे , हे गोरक्षक जनावर बाहेर विकायचे म्हटले तर रस्तोरस्ती अडवत आहेत. खंडणी बहाद्दर बनून खंडण्या गोळा करताहेत, असा आरोप करून सदाभाऊ खोत म्हणाले, त्याचा फटका गावगाड्याच्या शेतकऱ्याला बसत आहे. पूर्वी भाकड जनावरे विकल्यावर शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपये मिळायचे. त्याच्यामध्ये २०-२५ हजार रुपये घातले की नवीन जनावर विकत घेता येत होते. परंतु आता या गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडले आहेत. हे गोरक्षक आता गोभक्षक झाले आहेत. आणि आता लढा दिल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही.
आता आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत. कारण आता ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्यांच्या घामाची आहे. म्हणून आता या गोरक्षक नव्हे तर गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांशी नांगराचा फाळ हातात घेऊन लढू, असा सणसणीत इशारा रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा, माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी गोवंश कायद्यामुळे शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या अडचणींचा सविस्तर उहापोह केला. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलेले आहे, शेती अडचणीत येऊ लागले आहे याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.