Saif Ali Khan Attack Case : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर मुंबईत मोठी खळबळ उडली. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. हा आरोपी सध्या कोठडीत असून पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तो बांगलादेशी असल्याचा आरोप देखील होत आहे. त्या अनुषगांनेही पोलीस चौकशी करत आहेत.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी महत्वाचे पुरावे लागले आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली. आज अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेत सैफ अली खान हल्ला प्रकरणाबाबत आरोपीची ओळख परेड, आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबत माहिती देत आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली?

“अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात पोलिसांना आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे प्राप्त झाले आहेत. तसेच पुढील तपास देखील सुरु आहे. आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबत काही संभ्रम आहे. मात्र, आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबत अद्याप कोणताही अधिकृत अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आम्ही देखील या अहवालाच्या प्रतिक्षेत आहोत”, असं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

“सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीच्या वडिलांच्या विधानाबाबत आम्ही काही सांगू शकत नाहीत. मात्र, आम्ही हे ठामपणे सांगत आहोत की जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे. त्या आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. न्यायालयात टिकतील असे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये फिजिकल , तांत्रिक पुराव्यांचा समावेश आहे. तसेच त्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास देखील सुरु आहे. तसेच आरोपी काही लोकांच्या संपर्कात आला होता. त्या सर्व लोकांची आपण चौकशी करत आहोत. तसेच आरोपी बांगलादेशी असल्याचेही पुरावे पोलिसांना मिळून आले आहेत”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तसेच या प्रकरणात आरोपीची ओळख परेड अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, तेही लवकरच होईल. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात एकाच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी आरोपी अद्याप तरी आढळून आलेला नाही. पण हा आरोपी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांची आम्ही चौकशी करत आहोत”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.