अहिल्यानगर: आगामी जातनिहाय जनगणना व २९ ऑगस्टचा मुंबईतील मराठा मोर्चा या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संघटन पुन्हा मजबूत केले जात आहे. यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत आरक्षण थोपवले होते. आता पुन्हा मोर्चे काढले जाणार असल्याने मंत्री भुजबळ दिशा देतील, त्याप्रमाणे लढा उभारला जाईल, असे समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज, शनिवारी नगरमध्ये बोलताना सांगितले.

समता परिषदेचे नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. त्याअंतर्गत ते आज नगरमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, बापूसाहेब भुजबळ, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, अंबादास गारुडकर, संजय गारुडकर, अनिल निकम, सुभाष लोंढे, भारत गारुडकर, किशोर जेजुरकर, अमित खामकर आदी उपस्थित होते.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यास समता परिषदेचा विरोध आहे. आमच्या न्याय्य हक्कांवर गदा येऊ नये यासाठी समता परिषद काम करते आहे. मराठ्यांना सरकारने आरक्षण दिले तसेच ईडब्ल्यूएसच्या १० टक्के आरक्षणात ८.५ टक्के आरक्षणाचा लाभ मराठ्यांना मिळाला आहे. त्यामुळे मराठ्यांचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्याची गरज नाही.

ओबीसींमध्ये साडेचारशेवर जाती आहेत, त्यांच्यासाठी फक्त २७ आरक्षण आहे. त्यापैकी केवळ १९ टक्क्यांचा खऱ्या ओबीसींना लाभ मिळतो. ५४ लाख मराठा ओबीसी झाल्याच्या दाव्यावर आम्ही हरकती घेतल्या आहेत. त्याची तपासणी व चौकशी सुरू आहे. कोणीतरी तोंड वर काढतो व छोट्या घटकांवर अन्याय होतो.

खोटी माहिती दिली तर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी जातगणनेकडे लक्ष ठेवायला हवे. एससी, एसटीची गणना होते, त्यांच्या संख्येनुसार नीती आयोग त्यांना निधी देतो. अशाच पद्धतीने ओबीसींच्या विकासासाठीही निधी जातगणनेमुळे मिळणार आहे. जातगणनेमध्ये प्रत्येकाने आपली जात शासकीय रजिस्टरमध्ये नोंदवली पाहिजे. कोणी चुकीची माहिती दिली, खोटी जात, खोटे वय, खोटा पत्ता दिला तर त्याची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही माजी खासदार समीर भुरबळ यांनी सांगितले.