अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीची इमारत हटवून तिथे भव्य राम मंदिराचं बांधकाम मोठ्या वेगाने चालू आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी या मंदिरात श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यापाठोपाठ आता न्यायालयाच्या निर्देशांनुसार ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करता येणार आहे. तसेच मथुरेतील मशिदीविरोधातला हिंदू संघटनांचा कायदेशीर लढा तीव्र झाला आहे. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली आहे, आता रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेच्या कामाला हिरवा कंदील दिला जावा, अशी विनंती संभाजीराजेंनी केली आहे. यासाठी संभाजीराजेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स या मायक्रब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, श्रीरामचंद्रांच्या पवित्र जन्मभूमीवर अतिक्रमण केलेला बाबरी मशिदीचा ढाचा हटवून त्या पुण्यभूमीवर पुन:श्च श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झाली. आपल्या देवदेवतांच्या पवित्र स्थानांवर झालेली अशी इतरही अतिक्रमणे हटवण्याच्या दिशेने कायदेशीर पावले टाकली जात आहेत. या मार्गात अनेक अडचणी असूनही जिद्दीने लढाई लढली जात आहे. मात्र जिथे काही अडचणी नाहीत तिथे मात्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडताना दिसत आहे.
संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेची पुनर्निर्मिती करावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून मी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत आहे. या पुनर्निर्मितीसाठी लागणारे वास्तू अवशेषात्मक पुरावे देखील उपलब्ध आहेत. मात्र भारतीय पुरातत्त्व विभाग हे ब्रिटिशांनी केलेले नियम दाखवत कोणत्याही कामास परवानगी देत नाही. भारत सरकार ब्रिटिशकालीन प्रतीकांची नावे बदलत आहे, ब्रिटिशांनी केलेले कित्येक कायदे देखील नुकतेच बदलण्यात आले. मात्र पुरातत्व विभागाचे ब्रिटिशकालीन नियम मात्र अजूनही बदलले जात नाहीत, हे दुर्दैवी आहे.
हे ही वाचा >> VIDEO : भारतीय हद्दीतून चीनने मेंढपाळांना हुसकावलं? काँग्रेसची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “मोदींनी २०२० मध्ये…”
माजी खासदार म्हणाले, देव दैवतांच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन केले जात आहे, ही बाब कौतुकास्पदच आहे, मात्र ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून देव, देश आणि धर्माचे रक्षण केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडासाठी तरी किमान पुरातत्व खात्याचे नियम अपवाद करावेत, जेणेकरून शिवभक्तांना शिवकालीन रायगड अनुभवता येईल आणि संपूर्ण जगाला आपल्या इतिहासाचा हेवा वाटेल. ही मागणी घेऊन केंद्र सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू असलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त यावर ठोस निर्णय घ्यावा, तीच छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल.