सांगली : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अलमट्टी धरणात मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसाच्या गेल्या एक महिन्यात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जूनमध्येच ५३ टक्के जलसाठा झाला आहे. घटप्रभा व कृष्णाखोऱ्यात पावासाचा जोर वाढल्याने मंगळवारी सकाळपासून अलमट्टीतून ३० हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली. कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सांगली, मिरज शहरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी जिल्ह्याचे कोकण समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह कृष्णा नदीच्या खोर्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात कोयना येथे १३७, महाबळेश्वर १२५ आणि नवजा येथे १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर चांदोली येथे ११३ आणि राधानगरी (जि. कोल्हापूर) येथे १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. कोयना धरणात २५.१२, चांदोलीमध्ये १५.८५ आणि अलमट्टी धरणात ६४.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून, शिराळा तालुक्यातील चरण मंडळात सर्वाधिक ६५.५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६ मिलीमीटर पाऊस झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.