सांगली : मान्सून हंगामातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती निवारण पथकाने शुक्रवारी सांगलीतील कृष्णा नदीत प्रात्यक्षिके सादर केली. जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. पाहणीनंतर आपत्ती निवारण पथक संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व महापालिकेच्या अग्निशामक पथकाने आज कृष्णा नदीत पूरस्थिती हाताळण्याबाबत प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी ‘एनडीआरएफ’ पथकाने महापालिकेच्या पथकाला प्रशिक्षणही दिले. महापुरात बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी कृती कशी असावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बोटींचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ‘एनडीआरएफ’ टीमचे प्रमुख संतोषकुमार तिवारी व त्यांची २४ जवानांची टीम, तसेच अग्निशामक दलाच्या प्रमुख सुनील माळी व त्यांची ३१ जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या सात बोटी या वेळी तयार ठेवण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आवश्यकता असलेले साहित्य आणि उपकरणे इत्यादींचे प्रदर्शन या वेळी मांडण्यात आले होते.

नागरिकांनी पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून संभाव्य हानी टाळण्यासाठी जागृत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी या वेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका प्रशासन संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असून, यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, साहित्य, तसेच पूरबाधित नागरिकांच्या निवाऱ्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे आयुक्त गांधी यांनी सांगितले. आपत्ती ॲप व आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सज्ज असून, नागरिकांनी या कक्षाशी संपर्क साधून मिळालेल्या माहितीची खातरजमा करावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदी उपस्थित होते.