सांगली : राज्यातील महायुती शासनाने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे बुधवारी सांगली व मिरज शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत, पेढे- साखर वाटप करून स्वागत केले. या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे समाजबांधवांकडून आभार मानण्यात आले. दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या कुणबी नोंदी शासनाने मान्य केल्या असल्या तरी सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाचे सातारा व औध गॅझेटला मान्यता कधी मिळणार याकडेच लक्ष लागले आहे. कारण याच गॅझेटमधील नोंदीवरून जिल्ह्यातील बहुतांशी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.

सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजाची बऱ्याच वर्षाची मागणी मान्य केल्याबद्दल संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करण्याबरोबरच राज्यातील महायुती शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल राज्यातील महायुती शासनास विशेषता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले. यावेळी शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करत घोषणाबाजी करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांनीही यावेळी फुगडी खेळून आपला आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत, पेढे – साखर वाटप करत आनंद व्यक्त केला.

मिरज शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकामध्ये फटाके फोडून आनंद साजरा केला. यामुळे गरीब मराठा कुटुंबांना प्रगतीची दारे खुली झाली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. इस्लामपूर शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी रात्रीच जल्लोष करण्यात आला.

या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे समाजबांधवांकडून आभार मानण्यात आले. दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या कुणबी नोंदी शासनाने मान्य केल्या असल्या तरी सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाचे सातारा व औध गॅझेटला मान्यता कधी मिळणार याकडेच लक्ष लागले आहे. कारण याच गॅझेटमधील नोंदीवरून जिल्ह्यातील बहुतांशी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, हैद्राबाद गॅझेटमध्ये असलेल्या कुणबी नोंदी या प्रामुख्याने मराठवाड्यातील असून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुणबी नोंदी प्रामुख्याने सातारा व औंध गॅझेटमध्येच आढळून येण्याची चिन्हे आहेत. कारण या भागावर प्रामुख्याने सातारा व औंध संस्थानची सत्ता होती. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, कवठेमहांकाळ या भागातील कुणबी नोंदी सातारा गॅझेटमध्येच आढळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच विटा, आटपाडी, खटाव, माण या तालुक्यातील कुणबी नोंदी औंध गॅझेटमध्येच आढळणार आहेत. यामुळे या गॅझेटबाबत शासनाची भूमिका काय असेल याकडे मराठा समाजाचे लक्ष आहे.