सांगली : चालू वर्षी गणेशोत्सव कालावधीमध्ये म्हणजे ५ सप्टेंबर रोजी पैगंबर जयंती असली तरी यानिमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक ९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय मिरजेतील मुस्लिम समाजाने घेतला.

उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गणेशोत्सव कालावधीमध्ये पैगंबर जयंती आहे. हिंदू, मुस्लिम समाजाच्या दृष्टीने दोन्ही सण उत्साहात साजरे व्हावेत, सामाजिक ऐक्य अबाधित राहावे यासाठी बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, जुलूस कमिटी, खादिम जमाती, के.एम.एम. सुन्नी कमिटी सदस्यांनी पैगंबर जयंती मिरवणूक गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर दि. ९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला. या मिरवणुकीत शाळेची मुले उत्साहाने सहभागी होत असतात.

यामुळे जिल्हाधिकारी यांनी दि. ९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या बैठकीला माजी नगराध्यक्ष ए.जी. नदाफ, असगर शरीकमसलत, महमंद सतारमेकर, सलीम मगदूम उपस्थित होते. कडेगावची मिरवणूक गणेशोत्सवानंतर गणेशोत्सवाचा कालावधी असल्याने मिरजेपाठोपाठ कडेगाव येथील पैगंबर जयंतीची मिरवणूक गणेशोत्सवानंतर काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे.

यावर्षी गणेशोत्सवाच्या काळातच दि. ५ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती आहे. पैगंबर जयंतीची मुस्लिम समाजाकडून मोठी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. हिंदू बांधवांचा गणेशोत्सव असल्याने या वर्षी पैगंबर जयंतीचे सर्व धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर करण्याचा निर्णय मिरज व कडेगावमधील मुस्लिम समाजाने घेतला. मिरज शहरात ९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची ए.जी. नदाफ, असगर शरीकमसलत, सलिम मगदूम, महमंद सतारमेकर यांनी माहिती दिली.

कडेगावमध्ये ८ सप्टेंबर रोजी पैगंबर जयंती साजरी करण्याची आणि मिरवणूक काढण्यात येणार आहे. कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने साजीद पाटील, हाजी मूकतार पटेल, इम्तियाज शेख, आशरफ तांबोळी, आसिफ तांबोळी, सिद्धीक पठाण, नाशिर पटेल, समीर इनामदार यांनी माहिती दिली.

दरम्यान, पैगंबर जयंती निमित्त मोठी मिरवणुक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने दि. ९ सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मिरजेतील जुलुस कमिटीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.