सांगली : पक्षप्रवेशाची दोन निमंत्रणे असतात, एकामध्ये प्रत्यक्ष बोलावून ते दिले जाते, तर दुसऱ्यामध्ये उघडपणे याबाबत चर्चा केली जाते. पहिला प्रकार हा खरोखरच पक्षाप्रवेशाबाबत असतो, तर दुसऱ्या प्रकारास कुणी गांभीर्याने घेत नाही. खा. विशाल पाटील हे अपक्ष असल्याने त्यांना अशी पक्षप्रवेशाची निमंत्रणे येत राहतील, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आ. पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्यालयात येऊन आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासमवेत पक्षाचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खा. विशाल पाटील हे कामाचे नेतृत्व असून, त्यांनी आमच्या पक्षात यावे, असे सांगत खा. पाटील यांना भाजप प्रवेशाचे जाहीर निमंत्रण दिले होते. याबाबत आ. पाटील म्हणाले, की खा. पाटील हे अपक्ष आहेत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पक्षांकडून प्रवेशाची निमंत्रणे येत राहतील. ही निमंत्रणे दोन प्रकारची असतात. एक प्रत्यक्ष बोलावून दिले जाते, तर दुसरे जाहीर बोलण्यातून दिले जाते. जाहीर निमंत्रणाची चर्चा होते, मात्र यातून घडत काहीच नाही. खा. पाटील हे अपक्ष आहेत. त्यांना वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफर येत राहतील, त्यांनी कोणत्या पक्षात जावे, कोणासोबत जावे हे तेच ठरवतील. तो त्यांचा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाही
पक्षामध्ये युवा आमदारामध्ये नेतृत्वाबाबत नाराजी आहे का असे विचारले असता ते म्हणाले, की आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. केवळ माध्यमांतूनच अशा बातम्या वाचण्यास मिळतात. याबाबत पक्षाचे सर्वोच्च नेते खा. शरद पवारच काय तो निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतही आमच्या पक्षात कोणतीच चर्चा नाही; मात्र, तिकडील बाजूस अशी चर्चा होत असेल, तर मला ज्ञात नाही असे त्यांनी सांगितले.