सांगली : सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि. २४) ते सोमवार (दि. २७) दरम्यान नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी रविवारी दिली.

उरूण-इस्लामपूर, आष्टा, विटा, पलूस, जत, शिराळा, आटपाडी या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक आहेत. गेल्या १० वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे व या निधीतून गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारवरील विश्वास सांगली जिल्ह्यातील मतदारांचा वाढला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे.

सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार (दि. २४) ते सोमवार (दि. २७) या दरम्यान पक्षाच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज घ्यावेत व दि. २६ व दि. २७ ऑक्टोबर या दोन दिवशी पुन्हा आपले अर्ज आवश्यक त्या माहितीसह कार्यालयात सादर करावेत. यामध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कामाचा कार्यअहवाल पक्ष कार्यालयाकडे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर करताना सादर करावा.

या निवडणुकीमध्ये इस्लामपूर व आष्टा नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, जत नगरपरिषद व आटपाडी नगरपंचायत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई कांबळे, विटा व पलूस नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी माजी आमदार विलासराव जगताप व जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील तर शिराळा नगरपंचायत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आ. इद्रीस नायकवडी व माजी आ. राजेंद्रआण्णा देशमुख यांची प्रदेशध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इच्छुकांच्या मुलाखती त्या-त्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या क्षेत्रामधील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दि. २८ ते दि. ३० ऑक्टोबर या दरम्यान पार पडणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या माहितीसह दिलेल्या वेळेत त्या-त्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या क्षेत्रामधील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सादर करावेत व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. भोसले-पाटील यांनी केले आहे.