सांगली : बनावट नोटा तयार करण्याचे कसब शिकवणाऱ्याला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून पाचशे दर्शनी मूल्य असलेल्या १३०० बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. १०) रोजी पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या १९ हजार ६८७ बनावट नोटा, आणि दोनशे रुपयांच्या ४२९ बनावट नोटा असे सुमारे एक कोटीच्या नोटा, पावणे दोन लाखांचे नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि दहा लाखांची विनानंबरची इनोव्हा मोटार जप्त केली होती.
या संशयित आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासानंतर अभिजित राजेंद्र पोवार (वय ४४ रा. गांधीनगर, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या साडेसहा लाखांचे मूल्य असलेल्या १३०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यामुळे या प्रकरणात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ६५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करत असून, त्यानेच बनावट नोटा तयार करण्याचे कसब संशयिताना दिल्याने तो या प्रकरणातील प्रशिक्षक आहे, हे स्पष्ट झाले.
या घटनेबाबत अधिक माहिती देत असताना सहायक निरीक्षक शिंदे यांनी सांगितले, मिरजेतील निलजी-बामणी रोडवरील पुलाखाली पोलिसांनी सापळा लावत सुप्रीत काडाप्पा देसाई यास अटक केली होती. त्याच्याकडून भारतीय ५०० रुपये मूल्याच्या चलनी नोटासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या ४२ हजार रुपये किंमतीच्या ८४ बनावटा नोटा मिळून आल्या. याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची ता. हातकणंगले), इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी कोल्हापूर), सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. ए.के.वैद्य मार्ग मालाड, पूर्व मुंबई) यांची नावे निष्पन्न झाली होती. त्यांच्याकडून १ कोटी ११ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या सर्वांची कसून चौकशी केली असता नोटा बनविण्याचे प्रशिक्षण देणारा पोवार असल्याचे समोर आले. यानंतर त्यालाही साडेसहा लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत होता. त्याला अटक होताच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.