सांगली : महापालिका निवडणुकीत जागावाटपामध्ये सन्मानजनक जागा मिळाव्यात, यासाठी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश आवटी यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी केली असतानाच राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनीही स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे. यामुळे भाजप व महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी दबावाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला असून, यामागे महापालिका निवडणुकीची रणनीतीच दिसून येते. महाविकास आघाडीतील आमदार विश्वजित कदम, जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर स्नेहभोजनाच्या निमित्ताने पक्ष बांधणीऐवजी गटबांधणीच पुढे येत आहे.
आवटी यांनी जनसंघर्ष विकास आघाडी या नावाने राजकीय पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. भाजपमधून उमेदवारीचा आग्रह धरत असताना १२ जागांचा आग्रह धरला आहे. अन्यथा आघाडीतून उमेदवारी दाखल करण्याचा मनसुबा यामागे आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तसेच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांची महापालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. त्यांचे भाजपशी फारसे सख्य दिसत नाही. अथवा स्थानिक पातळीवरील नेत्यांशी एकदाही निवडणुकीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.
दुसऱ्या बाजूला आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या माजी महापौर बागवान यांनीही सहा जागांचा आग्रह धरला असल्याचे समजते. समर्थकांना उमेदवारी मिळाली नाही, तर पर्याय म्हणून त्यांनीही मिरज स्वाभिमानी विकास आघाडीची नोंदणी केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून अन्य पक्षांतील समविचारी, उमेदवारी नाकारलेल्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे.
आवटी आणि बागवान यांच्या या राजकीय खेळीमुळे जसे भाजपचे नेते अडचणीत आले आहेत, तसेच आमदार जयंत पाटील यांचा गटही अडचणीत आला आहे. महापालिका निवडणुकीला अद्याप अवधी असला, तरी राजकीय डावपेच आतापासूनच आखले जात आहेत. दबावाचे राजकारण करून जास्तीत जास्त समर्थक कसे मैदानात उतरतील, याचे नियोजन सुरू आहे.