सातारा : फलटण येथे आत्महत्या केलेल्या भगिनीला न्याय देणार आणि कोणत्याही राजकीय आरोपांना, दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे सांगितले.

फलटण येथे आयोजित भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आदी उपस्थित होते.

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील आत्महत्या केलेल्या डॉक्टर भगिनीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणार आहे. आत्महत्येचे कारण तळहातावर लिहून तिने आत्महत्या केली. तपासामध्ये नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही या भगिनीला न्याय मिळवून देण्याचे काम करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले, कोणतेही कारण नसताना रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे नाव पुढे करून त्यावरून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न घेऊन आमच्या सहकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. अशा राजकीय भूमिकेला उत्तर देण्याबाबत आम्ही कमी पडणार नाही असे खडेबोलही त्यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर व विरोधकांना सुनावले. याविषयी विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आरोपांना आणि दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

नीरा देवघर धरणाच्या कालव्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुष्काळमुक्तीसाठी कोणत्याही परिस्थितीत सांगोला माळशिरससह माण खटाव फलटण या दुष्काळी भागात पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सगळी कामे पूर्ण करून जे काम आजपर्यंत अशक्य वाटत होते असे दुष्काळ हटविण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. काही लोकांना प्रगत पश्चिम महाराष्ट्र नको आहे. त्यांना या परिसरात पाणी नको आहे. ते सर्व प्रश्न असेच अधांतरी ठेवून लोकांच्या जीवावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. हा दुष्काळ दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर हरित माणदेश तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नीरा देवघर, जिहे कटापूर, टेंभू उपसा योजनेचे वेगवेगळ्या टप्प्यातून दुष्काळी तालुक्यांना पाणी दिले आहे. सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्यापासून वंचित २२ गावांना पाणी देण्यात येईल. नीरा देवघर प्रकल्पातील तीन उपसा सिंचन योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी आणि दुष्काळमुक्तीसाठी शासन इथल्या जनतेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, याचा पुनरुचार त्यांनी केला. वीज बिलांमध्ये शेतकऱ्यांना माफी आम्ही पाच वर्षे कायम देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. उपसा सिंचन योजनांना वीज बिलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदींची भाषणे झाली.

फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित उपनिरीक्षक आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे. या उपनिरीक्षकाने महिला डॉक्टरवर पाच वेळा अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने मृत्यूपूर्व आपल्या तळहातावर लिहिलेल्या नोंदीत केला आहे.

त्याच्याकडून त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे. त्याच्या वाहनाची तपासणी करायची आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती घ्यायची आहे. कोणताही संशयित आरोपी सुरुवातीला आपला काहीही संबंध नाही, असे सांगत असतो. मात्र, हा गुन्हा गंभीर असल्याने याला आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील यांनी केली होती.

न्यायालयाने गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या केलेल्या दिवसापासून गोपाल बदने फरारी होता. शनिवारी रात्री उशिरा तो फलटण शहर पोलीस ठाण्यात शरण आला. त्याला आज सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील हा मुख्य संशयित आरोपी आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या दोन झाली आहे.