सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संघर्ष टाळत प्रमुख नेत्यांनी आज समन्वयाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात रामराजें , उदयनराजें, शिवेंद्रसिंहराजेंसह ११ संचालक बिनविरोध निवडून आले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह सत्ताधारी पॅनेलच्या दहा जणांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना सत्ताधारी पॅनेलमध्ये घ्यावे असा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी व उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आग्रह केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थोडी नरम भूमिका घेतल्याने उदयनराजेंचा सत्ताधारी पॅनेलमध्ये प्रवेश झाला .
आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बँकेचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे, खासदार उदयनराजे, आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील, दत्ता नाना ढमाळ, अनिल देसाई, शिवरूप राजे खर्डेकर आदी ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेनंतर अखेर उदयनराजे भोसले यांना सर्व पक्षीय सत्ताधारी पॅनलमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक सोपी झाली.
महिनाभरापासून चर्चेच्या फेऱ्याच सुरू होत्या –
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने तीन उमेदवार दिले होते. मुळात राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सामावून घेण्याबाबत गेल्या महिनाभरापासून चर्चेच्या फेऱ्याच सुरू होत्या. त्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोध असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्व जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. पुण्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी पॅनेलमध्ये घेण्यास हिरवा कंदील दिला.
शिवेंद्रसिंहराजेंची अखेरच्या क्षणापर्यंत विरोधाची भूमिका कायम –
त्यानुसार आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उदयनराजेंच्या विरोधात दाखल सर्व अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे ते बिनविरोध झाले. तसेच सातारा सोसायटी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधातील अर्ज ही मागे घेतल्याने तेही बिनविरोध झाले.
उदयनराजेंनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनेलमध्ये घ्यावे, यासाठी सर्व प्रकारचे दबावतंत्र प्रमुखांवर अवलंबले. जिल्हा बँकेच्या कारभारावरही टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीकाही केली. परंतु शिवेंद्रसिंहराजेंनी अखेरच्या क्षणापर्यंत विरोधाची भूमिका कायम ठेवली.
समर्थकांकडून सातारा शहरात फटक्याची आतषबाजी –
शेवटी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यस्थाची भूमिका घेते, दोघांत समन्वय घडविला. त्यामुळे रामराजेंसह उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, नितीन पाटील बिनविरोध झाले. दोन्ही राजे जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याने साताऱ्यातील दोघांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेसह सातारा शहरात फटक्याची आतषबाजी करत आनंदोत्सवा साजरा केला. रामराजे प्रकृती अस्वस्थ असल्याने मागील दोन दिवस पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तरीही त्यांनी सतत संपर्कात रहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे, मकरंद व नितीन पाटील यांच्या संपर्कात रहात शरद व अजित पवारांशी बोलत सत्ताधारी सर्वसमावेशक पॅनल तयार केले. दुपारी ऑनलाईन पत्रकारांशी संपर्क साधत पॅनेलची घोषणा केली. यानंतर पटापट इतरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी सर्वांनी प्रयत्न करूनही अर्ज मागे न घेतल्याने जावळी सोसायटी गटात निवडणूक लागली.