सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागल्याने व लोकशाहीवरचा विश्वास आणि लोकाश्रय गमावलेले विरोधक निवडणूक आयोगापासून सर्वत्र धडका देत फिरत आहेत. मात्र, हरवलेला जनतेचा विश्वास कमावण्यासाठी जनतेमध्ये जायला तयार नाहीत. असे करून ते फक्त लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील शिंदे सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले.
सातारा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार सुहास बाबर, महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
महायुतीकडे आज प्रचंड मोठा लोकाश्रय आहे. आपल्याकडे आज २३२ जागांचे बहुमत आहे, आपण ८० जागा लढवून ६० जागी विजयी झालो आहोत. आज बाळासाहेब असते तर त्यांनी आपली पाठ थोपटली असती. मात्र, आपले विरोधक द्वेषाने पछाडलेले आहेत. ते कमजोर असतील, मात्र खूप कपटी आहेत. एकनाथ शिंदे दिवस रात्र काम करतात. मात्र, विरोधकांना एकनाथ शिंदे शिवाय काही दिसत नाही.
मी आयुष्यभर केलेल्या कामाच्या जोरावर मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो. बाळासाहेब असते तर तेव्हाही मी मुख्यमंत्री झालो असतो. मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य सरकार. आज, उद्या, परवा पडेल. मुख्यमंत्री पद जाईल. पण यांना माहितच नव्हते अरे मला तर महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्यमंत्री बनवला होता. तुम्हाला तर जनतेने उचलून फेकून दिले, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
लोकोपयोगी अनेक ऐतिहासिक निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतले. लाडकी बहीण योजना काहीही झाले तरी बंद होणार नाही. त्यामुळे आपल्याला चिंता नाही. त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांना जनतेने नाकारलेले आहे, म्हणून ते आता सर्वत्र ‘हंबरडा’ फोडत फिरत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पक्ष बांधत राहा. सातारा जिल्ह्यात आणि राज्यभर आपल्याला खूप काम करायचे आहे. त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा नामाेल्लेख टाळून कडवट टीका केली.
यावेळी शंभुराजे देसाई, आमदार महेश शिंदे यांची भाषणे झाली . जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
‘कोयना बॅक वॉटर फेस्टिवल’
महाबळेश्वर येथे मे महिन्यात महाबळेश्वर फेस्टिवल भरविला होता. त्याच धर्तीवर लवकरच बामणोलीपासून तापोळ्यापर्यंत कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात ‘कोयना बॅक वॉटर फेस्टिवल’ भरविणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.