Venna Lake, सातारा : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक येथील मुख्य प्रवेशद्वारावर पर्यटन होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी स्वतंत्र मार्गिका (बायपास) रस्ता व कमानी पुलाच्या उभारणीला वन विभागाने मंजूरी दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने या कामातील अडथळा दूर झाला आहे. लवकरच कमानी पूल व रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

महाबळेश्वर वेगवेगळ्या हंगामांत पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेले असते. या गर्दीमुळे महाबळेश्वर शहर व परिसरात सर्वत्र रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. विशेषतः महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर कोंडी जास्त होत असते. २० किलोमीटरच्या अंतर पार करण्यासाठी कधी कधी वाहनचालकांना दोन ते तीन तास लागतात. मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक येथे पर्यटक थांबतात. यामुळे या दोन ठिकाणी वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होते.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वेण्णा लेकपासून एकेरी वाहतुकीचा पर्याय समोर आला आहे. त्यासाठी बायपास रस्ता मंजूर करण्यात आला आहे. वेण्णा लेक येथून वाहतूक वळविण्यात येणार असून, ती पुढे धनगर वाड्यामार्गे मुख्य रस्त्यावरून शहरात वळविली जाणार आहे. त्यासाठी १७५० मीटर लांबीचा रस्ता व पूल व वेण्णा लेक येथील सांडव्याखाली एक कमानी पूल बांधण्यात येणार आहे.

तेराशे मीटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी दहा कोटी, तर पुढे साडेचारशे मीटर लांब रस्ता व ३० मीटर कमानी पुलाच्या कामासाठी १५ कोटी रुपये असा एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दिली. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रतिक्षा दूर

अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या परवानग्यांच्या चक्रात या रस्त्याचे काम रखडले होते. या भागाचे लोकप्रतिनिधी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सतत पाठपुरावा करून वनमंत्री गणेश नाईक यांच्या मदतीने यातील अडथळे दूर केले. अखेरची वन विभागासह राष्ट्रीय वन्य जीव मंडळाचीही परवानगी मिळाली आहे. या कामासाठी वन विभागाने ७८ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याने सर्व अडथळे दूर झाले आहेत.

वेण्णा लेक व बायपास रस्त्यावर बांधण्यात येणारा कमानी पूल पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या पुलावरून पर्यटकांना पावसाळ्यात वेण्णा धरणाच्या सांडव्यावरून वाहणार्‍या पाण्याचे, तसेच जंगलाचे विहंगम दृश्य पाहता येणार असल्याने हा नवीन पॉइंट म्हणून विकसित होऊ शकतो. त्यामुळे तो पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल असे सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर येथील उपअभियंता अजय देशपांडे यांनी सांगीतले.