कराड : देशातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात येणारे पाथरपुंज गाव आता पर्यटनाच्या जागतिक नकाशावर झळकणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाथरपुंजला ‘पावसाची राजधानी’ ही ओळख देत, ते पर्यटनाचे प्रमुख केंद्र (हब) बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
देवगड, चेरापुंजीसारखी ठिकाणे जागतिक पातळीवर ओळखली जातात. पण, पाथरपुंजमध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे या गावानेही अलीकडे विक्रम रचला आहे. येथील तुफान पाऊस, अतिवृष्टीमुळे हे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण सातासमुद्रा पार चर्चेचा विषय बनला आहे. यंदा १ जून ते १ सप्टेंबर या मान्सून हंगामात पाथरपुंजमध्ये तब्बल ६,८१३ मिमी पावसाची नोंद झाली. त्याच काळात चेरापुंजीत ३,९७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आकड्यांमधून पाथरपुंजचे पावसाळी वैभव जगासमोर आणण्याची वेळ आली असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पाथरपुंज हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने पर्यटकांना तिथे सहज प्रवेश मिळणे अवघड आहे. मात्र, पर्यावरणपूरक वाहनांचा पर्याय, नियोजित मुद्देसूद मार्गदर्शन आणि नियंत्रित प्रवेश यावर वन विभाग व पर्यटन विभाग संयुक्तरित्या काम करणार आहेत. दरवर्षी जून ते ऑगस्ट अशा अडीच महिन्यांत पाथरपुंज गावाच्या परिसरातील प्रत्यक्ष पाऊस अनुभवणे, निसर्गाचा मुक्तपणे आनंद घेणे आणि या दुर्मीळ डोंगरी स्थानिक खाद्यसंस्कृतीची चव चाखणे अशी ही एक दिवसभराची मस्त अन् अविस्मरणीय सहल ठरू शकते. सकाळी पाथरपुंजला पोहोचून, संध्याकाळी परतणे हे सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरू शकते. त्यामुळे या संदर्भात प्राथमिक बैठका पूर्ण झाल्याचेही पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या पुढील बैठकीत अंतिम नियोजन ठरवले जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पर्यटन विकास, त्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी नेहमीच आग्रही असल्याने वन विभाग व पर्यटन विभाग संयुक्तपणे प्रारूप आराखडा बनवणार आहेत. हा संयुक्तपणे बनवलेला प्रारूप आराखडा राज्यातील महायुती सरकारसमोर मांडणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पाथरपुंज हे गाव चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. हे ठिकाण प्रामुख्याने त्याच्या अतिवृष्टीसाठी ओळखले जाते, कारण येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो. हे गाव नैसर्गिकरित्या घनदाट जंगलाने आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले आहे. येथील पावसाचे प्रमाण चेरापुंजी किंवा भारतात अन्य ठिकाणी कोसळणाऱ्या सर्वाधिक पावसाच्या प्रदेशांशी तुलना करता येते. या भागात तुफान आणि अतिवृष्टी सारखा पाऊस असल्याने येथील निसर्ग हिरवागार असतो. त्यामुळे इथे अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. पावसामुळे या भागातील नद्या, नाले आणि छोटे धबधबे जिवंत होतात, ज्यामुळे पर्यटकांना एक अनोखा अनुभव मिळतो.
पाथरपुंजमधील हा पाऊस या भागातील कृषी आणि जलस्रोतांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे वारणा आणि कोयना नद्यांना पाणी मिळते, ज्यामुळे धरणे भरण्यास मदत होते. त्यामुळे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची वरील योजना पर्यटकां बरोबरच अभ्यासकांसाठीही अतिशय महत्त्वाची राहणार आहे.