सातारा : ज्या माणसांनी शेतकऱ्यांना अडवले, त्यांच्या सोबत स्वप्नातही बसणार नाही. तीस वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांना नाकारून जनतेने आपल्याला सत्ता दिली आहे. ज्यांनी तीस वर्षे तालुक्याला मागे नेले. आजवर राजकारणात त्रास देण्याचे काम केले, अडथळे निर्माण केले, अशा माणसांबरोबर मी कदापि जाणार नाही. त्यामुळे हे चर्चेतील मनोमीलन अशक्य असल्याची स्पष्टोक्ती करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजाळे (ता. फलटण) येथील सभेत मनोमीलन नाट्यावर तूर्तास तरी पडदा टाकला आहे.

रणजितसिंह म्हणाले, की सत्तेत संधी त्याच लोकांना मिळाली पाहिजे ज्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून आणण्यासाठी काम केले आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. नेतेपणाचा कोणताही अहंकार मला नाही. विरोधकांचा सन्मान कसा करायचा हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले आहे.

फलटण तालुक्यात सुरू असणाऱ्या मनोमीलन नाट्यावर पडदा टाकत त्यांनी भर सभेत कार्यकर्त्यांनाच विचारले. ‘मनोमीलन करायचे का?’ त्यावर समोर कार्यकर्त्यांमधून ‘नाही’ असा आवाज उमटला. यावर त्यांनी कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय दिला असल्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांत झालेल्या भेटींबद्दल बोलताना विरोधक म्हणून त्यांनी काही कामे सांगितली, तर त्यांचा सन्मान ठेवायचा असतो, असे म्हणून भेटी झाल्याचे खंडन केले नाही आणि दुजोराही दिला नाही.

दोनच दिवसांपूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे यांनी पुन्हा एकदा मनोमीलन दोन मनांचे होत असते. एकतर्फी होत नाही. फलटणच्या विकासाचे राजकारण करणार असाल तर मनोमीलन होईल, असे वक्तव्य करून चेंडू रणजितसिंह यांच्या कोर्टात टाकला होता. आज मात्र रणजितसिंह यांनी मनोमीलन तूर्तास तरी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गेली वीस दिवस सुरू असणार्‍या मनोमीलन नाट्यावर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अखेर पडदा टाकला.

मी विधानसभा निवडणूक जिंकल्यावरही सांगीतले होते, विकासाबाबत रामराजेंचाही सल्ला घ्या. त्यांचा सन्मान ठेवून आजही सांगतो, विकास कामांत त्यांचा सन्मान ठेवू, मात्र यामुळे गेल्या कित्येक वर्षांत सत्तेआडून तालुक्यातील जनतेला दिलेला त्रास आमच्या वाटेत तयार केलेल्या अडचणी कशा विसरता येतील असा प्रश्नही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला.