सातारा : सातारा जिल्हा निसर्गाने नटलेला आहे. यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी १ जून रोजी राबवणार असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा पालिकेच्या संयुक्त विद्यमाने पोलीस परेड मैदान येथे वृक्षलागवड अभियानास सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, अभिनेते सयाजी शिंदे, दिशा कमिटीच्या सदस्या रेणूताई येळगावकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील व नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ‘रस्तारुंदीकरणामुळे झाडे काढावी लागतात. ज्या ठिकाणची झाडे काढली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा देशी झाडांचे रोपण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानात ८ ते १० फूट उंचीची विविध प्रकारची २ हजार ८०० झाडे लावण्यात येणार असून, या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे ११० कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान ३.३ किमी लांब मार्गाच्या दुतर्फा १ हजार ५१४ झाडांची लागवड करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, यकृळ, पुत्राजिवा, कडुनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे. तसेच नगर परिषदेच्या वतीने आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हिण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशी विविध प्रकारची १ हजार २०० झाडे लावण्यात आली आहेत.