सातारा : सलग सहाव्या दिवशीही सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली गेली आहे. कैलास स्मशानभूमीच्या खालच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक भागांत ओढे नाले भरून वाहत आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावरही काही ठिकाणी पाणी जमा झाले असून, राज्य मार्गासह छोटे-मोठे रस्ते अनेक भागांत पाण्याखाली गेले आहेत. काही रस्ते खचले असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली आहेत.
या पावासामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहेे.
गेल्या आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत याचा जोर जास्त असल्याने शहरासह जिल्ह्यातील जनजवीन विस्कळीत झाले आहे. आज शुक्रवारी सलग सहाव्या दिवशीही सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. या सततच्या पावसामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली गेली आहे. कैलास स्मशानभूमीच्या खालच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. कोयना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोयना नदीवर साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला पार गावातील पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
सातारा शहरासह जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच आहे. या मान्सूनपूर्व पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, बाजारपेठेत शुकशुकाट आहे. यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेती पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप पूर्व पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतात पाणी घुसल्याने व शेतात पाणी साठल्याने ऊस, आले, हळद व इतर पिकांच्या लागवडीसाठी तयार केलेली शेतजमीन वाहून गेल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक घरेही या पावसामुळे पडली आहेत. संरक्षित भिंतीही कोसळल्या आहेत.
सातारा शहरात आज शुक्रवार सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सर्व रस्त्यांवर पाणी-पाणी झाले होते. नागरिकांना शिकस्त करून रस्त्यावरून चालावे लागत होते. दुचाकी चालकांचीही त्रेधा उडाली आहे. शिंदी (ता. महाबळेश्वर) गावातील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्याने जीव धोक्यात घालून, प्रवास करू नये, असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.
महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी, सातारा, माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, लोणंद येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. धरण परिसरात सर्वाधिक ११४ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
माण तालुक्यात म्हसवड येथील रिंगावन पेठ मैदानात पावसाचे पाणी साठल्याने या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. माण तालुक्यातील कुळकजाई श्रीपालवनमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. एकूणच पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शेती पिकासह अनेक शेतीची कामे पावसामुळे अडकून राहिली आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरण परिसर – ११०, कास ११४, बामणोली – ११९, ठोसेघर – १२१, महाबळेश्वर – ९३, प्रतापगड – ७५, वाई – ७६, उरमोडी – ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.