चिपळूण – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती’, ‘सुबेदार’ व ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, यामुळे संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे.
‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात’ अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांमध्ये वाघा विषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड, आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.
सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत. २०१८ सालानंतर २०२३ साली १७ डिसेंबर रोजी पाच वर्षानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक एस.टी.आर. टी १ असा देण्यात आला.
कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये २३ एप्रिल २०२२ रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि १३ एप्रिल २०२४ रोजी त्या ठिकाणीच राहिलेला नर वाघ हा १०० किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी टिपला गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक एस.टी.आर. टी २ असा ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर २०२३ साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ २०२३ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यामुळे त्याला एस.टी.आर. टी ३ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. हाच वाघ कोकणातून चिपळूण वनपरिक्षेत्रात देखील जाऊन आला होता. सध्या एस.टी.आर. टी १ , एस.टी.आर. टी २ हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यान मध्ये असून एस.टी.आर. टी ३ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे.
शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना नाव देण्यात आली आहेत एस.टी.आर. टी १ या वाघाला सेनापती तर एस.टी.आर. टी २ या वाघाला सुभेदार आणि एस.टी.आर. टी ३ या वाघाला बाजी असे नाव देण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले त्यामुळे या खोऱ्यात नांदणाऱ्या वाघांची नावे स्वराज्यातील सरदारांना असलेल्या पदव्यांच्या नावे देण्यात आली आहेत एस.टी.आर. टी १ हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्प झाल्याने लढाई ज्याप्रमाणे सेनापती सर्वप्रथम येतो त्यावरून या वाघाला हे नाव देण्यात आले आहे.
वाघांना दिलेली नावे
- एसटीआर–टी१ :सेनापती
- एसटीआर–टी२ : सुबेदार
- एसटीआर–टी३ : बाजी
“आपल्या सह्याद्री व्याघ्र राखीवातील वाघांना स्थानिक लोकांनीच ही लोकप्रिय नावे दिली आहेत. यामुळे वाघांबाबत जनजागृती वाढते, त्यांच्याशी आत्मीय नातं जुळतं आणि संवर्धनाच्या कामाला नवी गती मिळते. ‘सेनापती’, ‘सुबेदार’ आणि ‘बाजी’ ही नावे सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची व परंपरेची आठवण करून देतात. – तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर</strong>.
सध्या ऑपरेशन ‘तारा’ या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून वाघीण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.” – किरण जगताप, उप संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना.
वाघांना लोकांनीच नावे देणे हा सामाजिक सहभागाचा एक अनोखा प्रकार आहे. त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा संगम भावी काळात संवर्धन, पर्यटन आणि जनजागृती या सर्वच दृष्टींनी महत्त्वाचा ठरणार आहे. – रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक.