बीड : शक्तिपीठ महामार्गास जिल्ह्यात विरोध कायम असून अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे संपादन प्रक्रियेतील मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी विरोध केला. बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली.

जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई या तालुक्यातील गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गाच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत या महामार्गास कडाडून विरोध दर्शविला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली शिवारात महामार्ग बाधित शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता भूसंपादन अधिकारी, तालुका प्रशासन व शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीन मोजणीसाठी शिवारात आले होते. दमदाटी होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या सर्व परिस्थितीत किसान सभेचे ॲड.अजय बुरांडे व व्यंकट ढाकणे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. शक्तिपीठ महामार्गास जिल्ह्यात शेतकऱ्यांचा होत असलेला कडाडून विरोध पाहता सरकारकडून होत असलेल्या पोलिसी बळाच्या गैरवापराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया ही भूसंपादनाच्या कायद्याला धरून केली जात नाही. ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी आक्षेप घेतले आहेत त्यांचा आक्षेपाचा निपटारा केला जात नाही. संयुक्त मोजणी करताना याची प्रक्रिया केली जात नाही. कायद्यात तरतूद नसलेले प्रलोभन शेतकऱ्याला दिले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया दडपशाहीमध्ये भीतिदायक वातावरणामध्ये पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात केली जात आहे. भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला असता काल मला बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले होते. – ॲड.अजय बुरांडे, जिल्हाध्यक्ष – किसान सभा बीड.