अहिल्यानगर : राज्यभर गाजत असलेल्या व विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनातही उपस्थित झालेल्या शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲप घोटाळ्याचा तपास थंडावला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गुन्ह्याचा तपास केवळ सुरू असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. आज, बुधवारी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पुन्हा केवळ तपास सुरू असल्याची माहिती दिली. या गुन्ह्यात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. तसेच तपासात कोणाचा दबाव नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारी प्राप्त होऊनही पोलिसांनी कार्यवाही केलेली नव्हती. शनैश्वर देवस्थानकडूनही तक्रार देण्यात आली नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सायबर क्राईम शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे. या घडामोडी दरम्यान देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याचे आढळले.
त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांना माहिती देताना, देवस्थानने परवानगी दिलेली तीन व इतर चार असे ७ ॲप निष्पन्न झाल्याचे व त्या माध्यमातून देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमा आढळल्याने सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती दिली होती.
बनावट ॲपच्या संदर्भात चौकशीसाठी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते तसेच ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांबाबत स्पष्टीकरण मागितले होते, मात्र त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाली नसल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते.
त्यानंतरही तपासात फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे मोठी व्याप्ती असलेला हा घोटाळा केवळ चौकशीच्या पातळीवरच अडकलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लवकरच माहिती दिली जाईल, असे पूर्वी सांगितले होते, प्रत्यक्षात मात्र या तपासाबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. या प्रकरणाच्या तपासात कोणताही दबाव नसल्याचे तपासी अधिकारी पेंदाम यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
३८ जणांची चौकशी
तपासी अधिकारी मोरेश्वर पेंदाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारी वकिलांचा सल्ला मागण्यात आला आहे. आत्तापर्यंत देवस्थानच्या विश्वस्तांसह, कर्मचारी, पुजारी अशा एकूण ३८ जणांची चौकशी करण्यात आली आहे. २० बँक खाती तपासण्यात आली आहेत. ॲपच्या माध्यमातून कोणाला पैसे मिळाले, पैशाचे व्यवहार कसे झाले याची माहिती घेतली जात आहे. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.