Shiv Sena (UBT) and MNS Alliance: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याची चर्चा असताना आता दोन्ही नेत्यांमधील पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होत असल्याचे दिसत आहे. ५ जुलै रोजी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येतील, असे सुतोवाच शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केले आहे. यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचे युवा नेते एकत्र हॉटेलमध्ये गप्पा मारताना दिसून आले. त्यानंतर न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे हस्तांदोलन करताना दिसले. या प्रसंगाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अनेक लोक शेअर करत आहेत.
वर्षभरापूर्वीच वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निवडणूक लढविली होती. वरळी आणि माहिम या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवरून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांचा विजय झाला. ज्यात माहिममध्ये राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पराभव सहन करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. ही चर्चा प्रत्यक्षात येणार का? याबाबत अजूनही काही निश्चित सांगता येत नसले तरी दोन्ही पक्षातील नेते आता एकमेकांना पूरक अशी विधाने करताना दिसून येत आहेत.
एकत्र येणे महाराष्ट्राच्या मनात
दरम्यान न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीच्या ‘समृद्ध महाराष्ट्र’ या मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी ५ जुलैच्या मोर्चात सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील, असे विधान केले. मराठी आणि मुंबईसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहेच आमच्यात कोणताही वाद नाही. एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या मनात आहे.
दरम्यान आम्ही मुंबई महानगरपालिकेसाठी नाही तर भाजपाने मुंबईची वाट लावली म्हणून एकत्र येत आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटले.
देख रहे हो ना बिनोद..?
— लोकनायक समाज सेवा संघ® (@loknayak1) June 27, 2025
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही!
आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे
हात मिळवला आणि दोघेही खळखळून हसले! ??@AUThackeray @SandeepDadarMNS@mieknathshinde@Dev_Fadnavis#AdityaThackeray#SandeepDeshpande#ShivSena #MNS #BJP#Maharashtra#BreakingNews pic.twitter.com/D6TU6uraxA
आदित्य ठाकरे – संदीप देशपांडे समोरासमोर
दरम्यान वृत्तवाहिनीसाठीची मुलाखत संपवून मंचावरून खाली आले असताना आदित्य ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे समोरासमोर आले. यानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी संदीप देशपांडे यांच्याबरोबर असलेल्या लोकांशीही हस्तांदोलन केले आणि खळखळून हसत काही वेळ संवाद साधला.
आदित्य ठाकरे यांनी मविआ सरकारच्या काळात मनसे हा संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यावर मनसेचे नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. मात्र आता एकत्र येण्याच्या चर्चेने नेते, पदाधिकारी यांच्यात मनोमिलन होताना दिसत आहे.