नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला. लोकसभेच्या मतदानापूर्वी नाशिक लोकसभेची जोरदार चर्चा झाली. शेवटच्या क्षणापर्यंत येथे उमेदवार घोषित केलेला नव्हता. नाशिक लोकसभा कोण लढविणार? यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाशिकसाठी प्रयत्नशील होते. तर शिंदे गटाकडून त्यांचा दावा सोडला गेला नाही. परिणामी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी घोषित झाल्याचा फटका बसला असल्याचे आता बोलले जात आहे. खुद्द हेमंत गोडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना उमेदवारी उशीरा जाहीर झाल्याबद्दल खंत व्यक्त केली.
हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकमध्ये अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला आहे. तसेच शेतकऱ्यांशी संबंधित काही धोरणामुळे नाराजी ग्रामीण भागात होती. संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसत होती. निवडणुका जाहीर होताच भाजपाने त्यांच्या २२ उमेदवारांची घोषणा केली होती. आमचीही यादी त्याचवेळेस जाहीर केली असती, तर त्याचा निश्चितच फायदा झाला असता.
माझी उमेदवारी जाहीर करण्यात उशीर केला गेला आणि त्यात मला काही स्पर्धक निर्माण झाले. त्यामुळे माझ्या दावेदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, त्याचा अप्रत्यक्ष फटका मला बसला, असेही हेमंत गोडसे म्हणाले आहेत. गोडसे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना यानिमित्ताने टोला लगावला. महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवाराची घोषणा पहिल्या टप्प्यातच केली होती. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या उमेदवाराशी जोडले गेले. त्यानंतर ते महायुतीकडे वळविणे अवघड होऊन बसले होते. मला जर महिन्याभराचा वेळ मिळाला असता तर शंभर टक्के निकाल वेगळा लागला असता. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणारच नाही, असा समज अनेकांचा झाला होता, असेही गोडसे म्हणाले.
महायुतीमध्ये सर्वांनीच आपापल्यापरिने योगदान दिले. भाजपा, मनसे, रिपाई, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माझे काम केले. ज्यांनी काम केले नाही, ते जनतेला माहीत आहेच. छगन भुजबळ यांनी तुमच्यासाठी प्रचार केला का? असा प्रश्न गोडसेंना विचारला असता ते म्हणाले की, कुणी काम केले किंवा नाही केले, याची कल्पना जनतेला आहे.
नाशिकमध्ये कुणाला किती मतदान?
नाशिकमध्ये उबाठा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी ६ लाख १६ हजार ७२९ मते घेतली. तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी ४ लाख ५४ हजार ७२८ एवढे मतदान घेतले. त्यांचा १ लाक ६२ हजार मतांनी पराभव झाला. तिसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर होते. त्यांनी तब्बल ४७ हजार मतदान घेतलं. तर अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती, त्या शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी ४४ हजार ५२४ मते घेतली.