सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी सावंतवाडी बस स्थानकावर एप्रिल फूल ढोल बजाओ आंदोलन छेडले. बस स्थानक सुरू झाले. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले.. कबुलायतदार गावकर जमीन वाटप.. असे अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित करत आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘‘एप्रिल फुल आणि आमदार गुल’’ अशा घोषणा देत सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत आज येथे ठाकरे गटाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्री केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांनी आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. गेली पंधरा वर्षे लोकांच्या डोळय़ात धूळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप करून यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असल्याचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले. केसकरांनी आपल्या आमदारकीत मंत्रीपदाच्या काळात दिलेली विविध आश्वासने आणि घोषणा सपशेल फेल ठरल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज ठाकरे गटाच्या माध्यमातून येथील बसस्थानक परिसरात एप्रिल फुल आंदोलन करण्यात आले.
रुपेश राऊळ म्हणाले, शिवसैनिकांनी केसरकर यांनी आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी गावोगावी फिरून मतांचा जोगवा मागितला होता. त्यामुळे केसरकर यांच्या कडून विकास कामे पूर्ण करून घेण्यासाठी शिवसैनिक प्रत्येक कामावर जाऊन आंदोलन छेडतील आणि केसरकर यांच्या कडून कामे पूर्ण करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. यावेळी ढोल बडवून केसरकरांचा निषेध करण्यात आला. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रुतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.