“दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली?” असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जारी केलेल्या पत्रकाचा दाखला देत फेसबुक पोस्टवरुन टीका केलीय. “दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्मे लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

“शासन स्तरावर विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. नुसतं निवेदन देऊन फोटो काढायचा आणि भली मोठी आकडेवारी छापून बातमी प्रसिद्ध करायची, यातून कामे होतात का? तुम्ही १५ वर्ष खासदार होता त्यावेळी कार्यबाहुल्याच्या नावाखाली संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी का असे फोटोसेशन होत नव्हते. पालिकेच्या कार्यकालास चार वर्ष आणि आठ- दहा महिने उलटले, निवडणूक लागलीकीच बरी तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होते. शेवटच्या महिन्यातच बरं विकासकामांचा पाठपुरावा सुरु होतो, मोठमोठ्या घोषणा होतात आणि याचेच कुतूहल सातारकरांना आहे,” असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला आहे.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

“कास धरणाची उंची आमच्यामुळे वाढली हे तुम्ही पत्रकातून स्वतः कबुल केले त्यामुळे याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत. पहिल्यांदा तुम्ही खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कराडला गेला. आपल्या माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माहुली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केलात? केवळ शोबाजी केली, काहीतरी बदल झाला का? १५ वर्ष खासदार होता पण, केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा अथवा कराडवरून साधी नवीन, जलद रेल्वे तुम्हाला सुरु करता आली नाही. सातारा पालिकेला जेवढा निधी मिळाला आहे त्यातील ९५ टक्के निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे. केंद्रातून काय मिळालं? साताऱ्याची हद्दवाढ जिल्हा परिषदेत कोणी अडवून ठेवली होती? तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी तुम्ही हा प्रश्न रखडून ठेवला होता त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून मीच घेतली. हाच तुमचा विकास होता का?” असा प्रश्न शिवेंद्रराजेंनी या पोस्टमधून विचारलाय.

“नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे. नुसतं फोटोसेशन करू नका सातारकरांसाठी खरंच काहीतरी आणा. ज्या बँकेच्या भ्रष्टाचाराची पुंगी सारखी वाजवताय ती बँक कायदेशीररित्या मर्ज केली. कोणाचा एक रुपयाही बुडवला नाही. उलट बँक मर्ज होऊ नये आणि लोकांची अडचण सुटू नये म्हणून शक्य तेवढे प्रयत्न तुम्ही केले पण, तुम्हाला यश आले नाही. एवढा तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय तर ज्या अजिंक्यतारा कारखान्याच्याबाबतीत नेहमीच गरळ ओकत असता त्या कारखान्याच्या निवडणुकीला पॅनेल का उभे केले नाही? छाती काढून यायचं होत ना सभासदांच्या पुढं. कोणी अडवलं होतं? तुमच्या पत्रकबाजीने तुम्ही केलेली कुकर्मे लपणार नाहीत,” अशा कठोर शब्दांमध्ये शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका केलीय.

“सातारा पालिकेत झालेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिला आहे. नशीब, पालिका इमारत नागरिकांच्या मालकीची आहे नाहीतर ती सुद्धा तुम्ही आणि तुमच्या आघाडीने विकून खाल्ली असती. मला पण भाऊसाहेब महाराजांचा वारसा आहे. सातारकरांसाठी भाऊसाहेब महाराजांनी भरभरून केले आणि सातारकरांनी ते बघितलेही आहे. त्यामुळे मला वारस्याचं सांगू नका. जनतेची कामे करतो, विकासकामे मार्गी लावतो म्हणून मला जनतेची साथ आहे. तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. लोकांची कामे करा आणि त्याबद्दलच बोला. भलता फापटपसारा लावू नका. जसे केंद्रात जाऊन निवेदने देताय, तसं एक निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही द्या आणि स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचे काम तेवढे मार्गी लावा,” असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.

“राजे शहरातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे, हे तुम्हाला का दिसत नाही. सातारकरांचा किती अंत पाहणारा आहात? फोटोसेशन करून नौटंकी करणाऱ्यांचा कावा सातारकरांनी ओळखला आहे. त्यामुळे तुम्ही सातारकरांना कितीही गाजरं दाखवली तरी तुम्ही केलेल्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर लवकरच करतील,” असेही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.