सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमीलनाच्या प्रश्नाचा चेंडू सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे टोलविला होता. शिवेंद्रसिंहराजे यांनी या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. ते म्हणाले, ‘पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सातारा जिल्ह्यासंदर्भात जो निर्णय घेतील, त्या निर्णयानुसार पुढील हालचाली होतील.येथील राजवाडा परिसरात बहुमजली पार्किंगच्या विकसन प्रक्रियेसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

ते म्हणाले, ‘सातारा पालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. खासदार उदयनराजे भोसले व मी स्वतः भाजपमध्ये एकाच पक्षात असून, आम्ही जबाबदार पदाधिकारी आहोत. सातारा जिल्ह्याच्या संदर्भाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यानुसारच पुढील निर्णय होतील. येथील जुन्या जनावरांच्या दवाखान्याची जागा पालिकेला हस्तांतरणाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘याबाबत यापूर्वी पालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा झाला होता. बहुमजली पार्किंगच्या कामासंदर्भात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम कोणाकडूनही घडो, ते होणे महत्त्वाचे आहे,’ असे सूचक विधान त्यांनी केले.

सातारा शहरात पालिकेच्या जागांमध्ये मटक्याचे अड्डे सुरू असतात असे निदर्शनास आणले असता, शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘ पोलिसांना याबाबत योग्य ते निर्देश देऊन कठोर कारवाई करण्यासंदर्भात मी बोलणार आहे. सातारा शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवसाचे फलक लागत असतात. फलक माझा असो किंवा खासदार उदयनराजे भोसले यांचा असो आम्ही दोघेही अशा प्रदर्शनाच्या विरोधात आहोत. पालिकेला याबाबत यापुढे असे फलक लावता कामा नये, अशा लेखी सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छावा संघटना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूर येथे जोरदार भांडण झाले. त्यामध्ये छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण झाली. याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले , प्रत्येकाला निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. काही वेळा कार्यकर्त्यांच्या भावना या अनावर होतात आणि त्यातूनच असे प्रकार घडतात. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना जरूर नियंत्रणात ठेवाव्यात. घडलेला प्रकार अत्यंत निंदनय आहे. या घटनांचे विचित्र पडसाद उमटू नये म्हणून लातूर जिल्हा प्रशासन व पोलिसांना त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.