आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली असून विधानसभा अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उपरोधीक टोलेबाजी केली आहे. “त्यांनी लोकशाहीचा मान आणि इज्जत राखली”, म्हणत भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “आज जी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतो. या निवडणुकीचं श्रेय त्यांना देतो. गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ‘आम्हाला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ द्या’ अशी मागणी करत होते. पण राज्यपालांनी ही मागणी मान्य केली नाही. आता दोनच दिवसांपूर्वी जे सरकार अस्तित्वात आलं, त्यांना मात्र ताबोडतोब अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची परवानगी राज्यपाल महोदयांनी दिली. राज्यपाल महोदयांनी घटनेची बूज चांगल्याप्रकारे राखली. लोकशाहीचा मान आणि इज्जत त्यांनी राखली आहे. त्यामुळे आजची निवडणूक पार पडली. यामुळे मी राज्यपालांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो,” अशा शब्दांत भास्कर जाधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उपरोधीक टोलेबाजी केली आहे.

सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं शिंदे गटाच्या आमदारांकडून पालन न झाल्याबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “सुनील प्रभू हेच अधिकृत प्रतोद आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे विधीमंडळातील अधिकृत प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांना बोलण्याची संधी दिली. झिरवळ यांची नियुक्ती महाविकासा आघाडी सरकारकडून करण्यात आली होती. पण नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील अधिकृत प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनाच बोलण्याची संधी दिली,” असंही जाधव म्हणाले.