गेल्या काही दिवसांपासून राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यावरूनही बराच वाद झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नवी मुंबईत माध्यमांशी बोलताना यावरून शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. तसेच, त्यांनी गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनाही लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आमच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे”

“उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आकसानं कारवाई करण्याचं काम सुरू आहे. सत्ताधारी पक्षातल्या लोकांवर कारवाई केली जात नाही. आमचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींविरोधात जिथे कारवाई होते, तिथे आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहतो. आमचे पदाधिकारी मडवींनाही जाणीवपूर्वक तडीपार केलं आहे. त्याला विरोध म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढला. मात्र, त्यानंतरही आमच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल होत आहेत. तसेच दोन गुन्हे वाशी पोलीस स्थानकात माझ्यावर दाखल झाले होते. त्यासाठी मी इथे आलो होतो”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

“हे भाजपाचेच शब्दप्रयोग”

“आपण अडीच-तीन वर्ष भाजपा नेते, सहयोगी सदस्य कशी वक्तव्य करत आहेत हे जरा तपासून पाहायला हवं. भाजपाच्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य इतकी अश्लाघ्य आणि निषेधार्ह आहेत. त्यात भाजपाच्या बाजूला शिंदेंचा गट जाऊन बसला आहे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. तो आता राहिलेला नाही. भाजपा कधीकधी आपले विचार दुसऱ्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत असते. म्हणून गुण नाही, पण वाण लागला आहे. शब्द जरी त्यांचे असले, तरी भाजपाचेच शब्दप्रयोग ते करत आहेत”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे गटासोबतच भाजपालाही लक्ष्य केलं आहे.

“सूर बदले है जनाब के, कालचा वाघ…” मनसेचा संजय राऊतांना उद्देशून खोचक ट्वीट; सुषमा अंधारेंनाही टोला!

“पीएमएलए कोर्टाचे ताशेरे फक्त ईडीवर नाही”

दरम्यान, संजय राऊतांना जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टानं ईडीवर ओढलेले ताशेरे हे केंद्र सरकारवरही असल्याचं जाधव यावेळी म्हणाले. “पीएमएलए कोर्टानं ओढलेले ताशेरे फक्त ईडीवर नसून केंद्राच्या कारभारावर, कृतीवर, प्रवृत्तीवरही आहेत. कोर्टानं अनेक आक्षेप नोंदवले आहेत. आम्हाला अनेक प्रकारचा मानसिक त्रास झालाय. पण यातून तरी ईडी आणि केंद्र सरकारचे डोळे उघडतील आणि भविष्यात असं कुणालातरी उगाच बेकायदेशीररीत्या अटक होऊन आपलं जीवन व्यतीत करावं लागणार नाही असं मला वाटतं”, असं त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray group slams abdul sattar gulabrao patil rno news pmw
First published on: 10-11-2022 at 17:41 IST