सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली-कुसगेवाडी येथे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. वीज वाहिनीचा धक्का लागून दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले, यात नागेश पांडुरंग गवस (वय ३०) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर त्यांचे बंधू संदीप पांडुरंग गवस (वय ४५) गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी गोवा-बांबुळी येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून बंद असलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे वायरमन आले होते. उंचीवर काम करण्यासाठी त्यांनी शिडी मागितली. ही शिडी आणत असतानाच सुरू असलेल्या वीज वाहिनीचा धक्का दोन्ही भावांना लागला. घटनेनंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र नागेश गवस यांना मृत घोषित करण्यात आले.
या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. धोकादायक वीज वाहिन्या बदलण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अपघाताला पूर्णपणे वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही महावितरणचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे वीज सुरक्षा आणि महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ओटवणे येथे वीज कोसळून घराचे मोठे नुकसान
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील गवळीवाडीत काल शुक्रवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार गडगडाटाचा फटका सुनीता सुरेश बुराण यांना बसला आहे. त्यांच्या घरावर वीज कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, मात्र आपत्कालीन व्यवस्थापनाने ६० हजार रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
रात्री झोपेत असताना अचानक झालेल्या प्रचंड गडगडाटाने आणि विजेच्या कडकडाटाने बुराण यांना जाग आली. घरात अचानक मोठा प्रकाश पडल्याने त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या घरावर वीज कोसळली आहे. या अनपेक्षित घटनेने त्या पूर्णपणे हादरून गेल्या होत्या, मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. या भीषण दुर्घटनेतून त्या सुखरूप बचावल्या आहेत. वीज कोसळल्याने बुराण यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे साहित्य खराब झाले आहे. या घटनेमुळे बुरान कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ६५.७५ मि.मी. पावसाची नोंद; आचिर्णे येथे घराची पडझड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १४ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ६५.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १४३ मि.मी. पाऊस पडला असून, कुडाळ तालुक्यात सर्वात कमी ४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
याव्यतिरिक्त, आचिर्णे बौध्द वाडीतील रहिवासी श्री. बाळकृष्ण बुधाची कदम यांच्या घराचा मागील भाग काल आलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ या घटनांची दखल घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.