सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलीस दलाने भारत सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलचा प्रभावीपणे वापर करत, गेल्या पंधरा दिवसांत हरवलेले ५४ मोबाईल ट्रेस करून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या यशामुळे मोबाईल गमावलेल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.भारत सरकारने मोबाईल चोरी किंवा हरवण्याच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत मिळवून देण्यासाठी https://www.ceir.gov.in हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. त्यानंतर पोलीस विभागाकडून तांत्रिक पद्धतींनी मोबाईलचा शोध घेऊन तो संबंधित धारकांना परत केला जातो.

सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून या CEIR पोर्टलबाबत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत होती, ज्यामुळे नागरिकांना मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास ऑनलाइन तक्रार कशी नोंदवावी याची माहिती मिळाली.२०१९ पासून आतापर्यंत CEIR पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण १०९० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी तब्बल ४८ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे ३२५ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. उर्वरित चोरीस गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी, पोलिस अधीक्षक श्री. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. निसर्ग ओतारी, पोलीस निरीक्षक आणि श्री. सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलीस ठाणे स्तरावर आणि पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली होती.

या पथकांनी १६ ते ३१ मे या कालावधीत मोबाईल ट्रेस आणि रिकव्हर करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि अंमलदारांनी केलेल्या तांत्रिक तपासणीनंतर ५४ मोबाईल ट्रेस करण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे हे ५४ मोबाईल दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ यांसारख्या विविध राज्यांतून, तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलिसांनी परत आणले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे श्री. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून एक विशेष कार्यक्रम आयोजित करून हे रिकव्हर केलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस अधीक्षक श्री. मोहन दहिकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल गहाळ झाल्यास, हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास त्यांनी https://www.ceir.gov.in या वेबसाइटद्वारे Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी