सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना आणि शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी एकत्रित येत शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर या संघटनांनी भव्य मोर्चा काढत आपले शक्तिप्रदर्शन केले. या मोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थी,माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.

उद्यापासून शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होत असताना, आज विद्यार्थ्यांसमवेत काढलेला हा भव्य मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शासनाच्या या निर्णयामुळे तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ९१ शाळा बंद पडणार आहेत, तर जिल्ह्यातील ८४३ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय, ५० हून अधिक शाळा एकशिक्षकी होणार असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी प्रसंगी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही या लढाईसाठी सज्ज राहण्याचा थेट इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे शिक्षक संघटना आणि शासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समिती अध्यक्ष जी ए सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी सचिव वामन तर्फे, मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष दिनेश म्हाडगुत ,सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण कर्मचारी संघटना सचिव गजानन नानचे यांच्या सह जिल्ह्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी या भव्य मोर्चात सहभाग घेतला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ

मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष दिनेश म्हाडगुत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. दऱ्या खोऱ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची निर्मिती झाली त्यामुळे शैक्षणिक प्रगती झाली. राज्यात शैक्षणिक दृष्ट्या सिंधुदुर्ग अव्वल ठरला आहे. मात्र १५ मार्च च्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल ९१ शाळा बंद पडणार आहेत, तर जिल्ह्यातील ८४३ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय, ५० हून अधिक शाळा एकशिक्षकी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील किंवा आर्थिक दृष्ट्या शिक्षण परवडणार नाही.