सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पुलाजवळ एका बाजूला बेवारस स्थितीत ढकलून ठेवलेल्या एका कारमध्ये मानवी रक्ताचे डाग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर कार आंध्र प्रदेशमधील असल्याचे स्पष्ट झाले असून, तिची नंबर प्लेट आणि कागदपत्रे गायब करण्यात आली आहेत. यामुळे कारमध्ये नेमका कोणता प्रकार घडला आणि रक्ताचे डाग कुणाचे आहेत, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून, घातपाताचा संशय बळावला आहे.

​गोवा – दोडामार्ग ते बेळगाव, कोल्हापूर मार्गावर तिलारी धरणाचे पाणी तिलारी नदीपात्रात मिळत असलेल्या पुलाजवळ कोनाळ स्मशान भूमीपासून काही अंतरावर ही बेवारस कार झाडीत ढकलून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली. काही गुराखी गुरे घेऊन गेले असता त्यांना ही कार दिसली. त्यांनी तातडीने पोलीस पाटील आणि दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली.

​माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता कारचे दरवाजे उघडल्यानंतर पुढील तसेच मागील सीटवर आणि खाली मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​कारची नंबर प्लेट आणि कागदपत्रे गायब असल्याने पोलिसांनी चेसिस नंबरवरून तपास सुरू केला. त्यावरून ही कार आंध्र प्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, कारमधील गॅरेज नंबरवरून बेळगाव येथील एका व्यक्तीचा शोध लागला, परंतु तो कन्नड बोलत होता आणि नंतर त्याने फोन बंद केला.

​कारमध्ये रक्ताचे डाग आढळून आल्यामुळे पोलिसांनी तातडीने नदीपात्रात तसेच पुलाखाली काही संशयास्पद मिळते काय, याची पाहणी केली. मात्र, कोणताही महत्त्वाचा पुरावा किंवा सुगावा हाती लागला नाही. कारच्या डिकीमध्येही काही आढळले नाही. यामुळे कारमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ती येथे नदीपात्राच्या दिशेने झाडीत ढकलून देण्यात आली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

​या कारमधील रक्ताचे डाग कुणाचे आहेत, कारमध्ये नेमका काय प्रकार घडला आणि कार येथे का ढकलून दिली, याचा तपास करणे हे दोडामार्ग पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस या दिशेने कसून तपास करत आहेत.