लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : घातक शस्त्रांसह दरोडा टाकणाऱ्या सहा संशयित आरोपींना चार तासांत अटक करून त्यांच्याकडून पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने असा शंभर टक्के मुद्देमाल जप्त केल्याची माहिती म्हसवड (ता. माण) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली.
या गुन्ह्यातील विजय बाबा शिंदे, समाधान शिदा गोरड, प्रवीण सुरेश गोरड, करण नवनाथ गोरड, विशाल महादेव नलवडे, अक्षय महादेव गोरड अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे अक्षय सोनवणे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, म्हसवड पोलीस ठाण्यात नागेश मोहन दीडवाघ ( दीडवाघवाडी, ता. माण) यांनी दरोड्याची तक्रार दाखल केली होती. ढाब्यावर जेवण करून परत जात असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने तसेच तलवार, कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या चेन व रोख रक्कम असा पाच लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस पथकाने आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली. सर्व सहा आरोपींना अवघ्या चार तासांतच पकडून दरोड्यांमध्ये लुटलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल, गुन्हा करताना वापरलेली शस्त्रे, वाहने जप्त केली.
सदरचे संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अक्षय सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी केली.