सोलापूर : एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांसह सासू-सासरे आणि पतीविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरात एका पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या फिर्यादीनुसार संबंधित अल्पवयीन मुलीचा विवाह गेल्या २२ मे रोजी झाला होता. त्यातून संबंधित मुलगी गरोदर राहिली. ही बाब छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीत उजेडात आली. तेव्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना कळविली.
दरम्यान, संबंधित मुलगी १७ वर्षांची अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून देण्यात आल्याप्रकरणी तिचे आई-वडील व सासू-सासरे तसेच पत्नीविरुद्ध सरकारतर्फे पोलीस हवालदार दीपक डोके यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस आयुक्त राधिका केंद्रे पुढील तपास करीत आहेत. यात कोणालाही लगेच अटक करण्यात आलेली नाही.