सोलापूर जिल्ह्य़ातील रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आयोजिलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीत निधीची कमतरता आणि तांत्रिक अडीअडचणींचा पाढा अधिकाऱ्यांनी वाचला, तर ढिसाळ नियोजनाबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दरम्यान, जिल्ह्य़ातील अपूर्ण सिंचन योजना मार्गी लागण्यासाठी अपुरा निधी व तांत्रिक अडचणी विचारात घेता या प्रश्नावर येत्या काही दिवसात मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैेठक घेण्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले. अकलूजमध्ये झालेल्या या बैठकीला शेकापचे नेते आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याच्या आमदार श्यामल बागल, माळशिरसचे आमदार हणमंत डोळस यांच्यासह सुधाकर परिचारक (पंढरपूर), विनायकराव पाटील (माढा), जयवंत जगताप (करमाळा) हे माजी आमदार उपस्थित होते. तसेच माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचीही उपस्थिती होती. बैठकीत उपस्थित प्रश्नांच्या उत्तरादाखल माहिती देताना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एम. एम. उपासे यांनी, सिंचन योजनांसाठीच्या अपुऱ्या निधीसह इतर तांत्रिक अडचणींचा ऊहापोह केला. ८० कोटींपर्यंत अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या सिंचन कामांना प्रत्यक्षात पाच ते दहा कोटींपर्यतच नगण्य निधी प्राप्त होतो, अशी अडचण त्यांनी मांडली.
या बैठकीत आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत प्रश्न उपस्थित केले. आंध्र प्रदेश शासन स्वत:च्या मालकीच्या जमिनी विकून अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करते. महाराष्ट्र शासनही हाच आदर्श घेऊन अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. दुष्काळी सांगोल्यातील सिंचन योजनांसाठी ५० कोटींचा निधी देण्याचे यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरले होते. परंतु हा निधी अद्यापि प्राप्त न झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्य़ात पाणी नियोजनात ‘टेल टू हेड’ या न्याय्य पध्दतीचा अभाव दिसून येतो. टेल टू हेड पध्दतीनुसार ‘टेल एन्ड’ला पाणी पोहोचत नाही. तर काही ठिकाणी कालव्यांना दरवाजे नसल्यामुळे काही भागात पाण्याचे तळे तर काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष असे विसंगत चित्र दिसून येते. पंढरपूर तालुक्यासह माळशिरस व माढा तालुक्यांसाठी भीमा नदीवरील बंधाऱ्यांवर दोन-दोन दरवाजे बसवून पाणी अडविण्याची सूचना सुधाकर परिचारक यांनी केली. तर, जेव्हा उजनी कालव्यात पाणी सोडले जाते, तेव्हा पंढरपूर तालुक्यातील बंधारे भरून घ्यावेत, अशी सूचना माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यात वडापूर धरणाचा आग्रह जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड, राजशेखर शिवदारे व चंद्रकांत घोडके यांनी धरला. करमाळा, माळशिरस, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आदी जवळपास सर्व तालुक्यांतील सिंचन प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्यासह बी. डी. तोंडे, धनेश निटूरकर, दीपक पांढरे, बी. आर. बोकडे हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2014 रोजी प्रकाशित
सोलापूर जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्प निधी व तांत्रिक अडचणींमुळे रखडले
सोलापूर जिल्ह्य़ातील रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आयोजिलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीत निधीची कमतरता आणि तांत्रिक अडीअडचणींचा पाढा अधिका-यांनी वाचला.
First published on: 21-06-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur district irrigation project incomplete due to funds and technical difficulties