सोलापूर : सोलापूरच्या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा मुहूर्त अखेर येत्या सोमवारपासून (दि. ९) गोव्याच्या रूपाने लागत असतानाच येत्या १ ऑगस्टपासून मुंबईसाठीही विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
येत्या ९ जून रोजी गोवा-सोलापूर-गोवा नागरी प्रवासी विमान वाहतुकीची सेवा सुरू होणार आहे. फ्लाय ९१ या विमान कंपनीमार्फत सुरू होणाऱ्या या ७२ आसनी विमानसेवेचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सोलापुरात येत आहेत. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. ही माहिती स्वतः पालकमंत्र्यांनी सोलापुरात प्रसार माध्यमांना दिली.
सोलापूरकरांना मुंबई विमानसेवेची मोठी आतुरता आहे. परंतु, मुंबई विमानतळावर सोलापूरसाठी सध्या तरी स्लॉट उपलब्ध होत नाही. मात्र, सोलापूरकरांची नाराजी ओळखून मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठीही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानसेवेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फ्लाय ९१ विमान वाहतूक कंपनीशी यशस्वीपणे चर्चा केल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
तूर्तास गोवा विमानसेवा सोमवारी (दि. ९) सुरू होणार असून, या विमानसेवेच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापुरात येत आहेत. त्यावेळी गोव्यासाठी विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवून मुंबई विमानसेवा सुरू करण्याचीही घोषणा फडणवीस हे करण्याची अपेक्षा आहे. मुंबई विमानसेवेची जबाबदारी फ्लाय ९१ कंपनी घेत आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.