सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यातील थेट लढतीला सुरूवातीपासून रंग चढत आहे. दोन्ही बाजूंनी दारूगोळा तयार असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आमदार सातपुते यांनी, आपल्या मालमत्तेचा हिशेब तयार असून सोलापुरातून अनेक वर्षे सत्ताकारणात प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा, असे आव्हान दिले आहे.

सोलापुरात माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरुद्ध ऊसतोड मजुराचा मुलगा, अशीच लढाई होणार असल्याचा पुनरूच्चारही भाजपचे उमेदवार सातपुते यांनी केला. आमदार सातपुते हे उपरे असून बीड जिल्ह्यातील आष्टीचे राहणारे आहेत. मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस राखीव मतदारसंघाशी कसलाही संबंध नसताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना गळ घालून राम सातपुते यांना निवडून आणण्यास सांगितले होते. त्यानुसार सातपुते यांना निवडून दिले गेले. त्यावेळी सातपुते यांचे आई-वडील ऊसतोड मजूर असून झोपडीत राहतात. त्यांनी माळशिरसमध्ये साखर कारखान्यांसाठी ऊसतोड केली होती, असा दावा करून सातपुते यांचा माळशिरसचा संबंध जोडण्यात आला होता. दरम्यान, आमदार झाल्यानंतर सातपुते यांनी टोलेजंग बंगला बांधला. स्वतःचा विवाह सोहळा धूमधडाक्यात श्रीमंतीच्या थाटात केला होता, असे मुद्दे त्यांच्या झोपडी आणि बंगल्याच्या छायाचित्रांसह आता लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांतून उपस्थित केले जात आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता आमदार सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या मालमत्तेचा मुद्दा मांडला.

हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

हेही वाचा – राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्‍हान, भाजपमधूनही विरोध

हेही वाचा – नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

आपण पाच वर्षांपूर्वी माळशिरसमधून विधानसभेवर निवडून आलो असताना सोलापूरसाठी उपरा कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपले आई-वडील ऊसतोड कामगार होते. आम्ही साध्या झोपडीत राहायचो. पण माझे शिक्षण बी. टेकपर्यंत झाले असून पत्नीही बी. टेक असून तिची आयटी कंपनी आहे. बँक कर्ज काढून बंगला बांधला आहे. त्याचा संपूर्ण हिशेब आपण द्यायला तयार आहोत. परंतु वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा, असे आव्हान आमदार सातपुते यांनी दिले.