पंढरपूर : येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जालना जिल्ह्यातील काही महिला भाविक आल्या होत्या. त्यातील दोन महिला चंद्रभागा नदीवर स्नानासाठी गेल्या. या दोन महिलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघी बुडाल्या. त्यांच्या शोध घेतला असून, त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला असून, त्याचा तपास सुरू आहे, असे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित घोडके यांनी माहिती दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे – जालना येथील दहा ते बारा महिला चंद्रभागेच्या तटावर गेल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ या दोन महिला चंद्रभागेच्या पाण्यात बुडाल्या. यामध्येच या दोघींचा मृत्यू झाला. तसेच या वेळी आणखी एक महिला चंद्रभागेत बुडाल्याची घटना घडली. या अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला आहे. त्याची माहिती घेणे सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घोडके यांनी दिली आहे.
सध्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करण्यासाठी येतात. मात्र, वाहते पाणी आणि काही ठिकाणी खड्डे पडल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना होत आहेत. आषाढी यात्रा काळात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत होती. मात्र, सध्या अशी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे नदीकाठचे कोळी बांधव अशा प्रसंगी जीव धोक्यात घालून शोधकार्यास मदत करत असतो.