सोलापूर : सोलापूर – पुणे लोहमार्गावर माढा ते वाकाव दरम्यान पायी चालत निघालेल्या दोन बांधकाम मजुरांचा समोरून येणाऱ्या पंढरपूर-म्हैसूर गोलगुंबज एक्स्प्रेसच्या इंजिनला धक्का लागून दोघेही दूर फेकले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा मजूर जखमी झाला.
विजय कय्यावाले आणि राहुल अशोक बेंजरपे (दोघे रा. लष्कर, लोधी गल्ली, सोलापूर) अशी दोघा मृत बांधकाम मजुरांची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा सहकारी संजय चंद्रकांत गिरबोणे हा जखमी झाला आहे.
माढा तालुक्यातील वाकाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाचे बांधकाम सुरू आहे. यातील दोघे मृत आणि जखमी असे तिघे या पुलाचे बांधकाम करीत होते. त्यासाठी ते सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीतून जात होते. वाटेत माढा-वाकाव हा लोहमार्ग लागतो. परंतु वाकाव स्टेशन आल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे ते पुढे माढा रेल्वे स्थानकावर उतरले आणि लोहमार्गावरून पायी चालत गप्पा मारत वाकावकडे निघाले होते. तेव्हा अचानकपणे समोरून पंढरपूर-म्हैसूर गोलगुंबज एक्स्प्रेस आली. गाडीच्या इंजिनचा जोरदार धक्का बसून तिघेही मजूर बाजूला फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.