सोलापूर : ‘ऑनलाइन खेळाच्या नावाखाली तरुणाईची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी व्यापक तपास करून २३ आरोपींविरुध्द न्यायालयात सुमारे पाच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या बेकायदा ऑनलाइन खेळातून ३६ कोटी ३३ लाख ६७ हजार ६२८ रुपयांचा बेकायदा व्यवहार झाला असून यात फिर्यादीसह इतर सात तरुणांची दोन कोटी ७८ लाख २६ हजार ७२६ रुपयांची फसवणूक झाल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे.
गेल्या १२ फेब्रुवारी रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. कुर्डूवाडीशिवाय बार्शी व सोलापूर जिल्ह्यात इतर ठिकाणी चालणारे या धंद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ऑनलाइन खेळाच्या बेकायदा धंद्यातून तरुणांना भुरळ पाडून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन महादू पाटमस, रणजित महादेव सुतार, वैभव बाबू सुतार (रा. कुर्डूवाडी) यांच्या विरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता.
नंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींच्या बँक खात्याची सखोल पडताळणी केली असता त्यात आणखी काही बाबी समोर आल्या. केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीशिवाय चालणाऱ्या या बेकायदा फनरेप फनगेम जीके ऑनलाइन गेमचा व्यवसायात कंपनीचे एजंट, वितरक आणि ठोक वितरकासह २३ आरोपींचा सहभाग असल्याचे आढळून आल्याचे पोलीस तपास अधिकारी संजय जगताप यांनी सांगितले.
या गुन्ह्याचा व्यापक तपास करून सर्व आरोपींविरुद्ध ४९८३ पानांचे दोषारोपपत्र माढा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड, गांगुर्डे, हवालदार हनीफ शेख, नागेश वाघमारे, माधव बोराडे, विनय यजगर, महिला पोलीस शिपाई नीता डोकडे आदींच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.