सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसी ओलांडून पुढे गेला आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी १७ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. दरम्यान, वाढता पाणीसाठा लक्षात घेत शुक्रवारी सायंकाळी धरणातून भीमा नदीत ११ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणात पुण्यातील खडकवासला, बंडगार्डन व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर सोडलेले पाणी दौंडमार्गे येऊन मिसळत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात दौंडमार्गे येणाऱ्या पाण्याची आवक ५८ हजार ५८५ क्युसेक एवढी प्रचंड होती. आषाढी यात्रा आणि उजनी धरणात प्रचंड प्रमाणात वाढणारा पाणीसाठा लक्षात घेता, पंढरपुरात पूरनियंत्रणासाठी जलसंपदा विभागाने उजनी धरणातून ११ हजार ६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू केल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या विसर्गामुळे भीमा नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणात एकूण १००.२४ टीएमसी पाणीसाठा होता, तर उपयुक्त पाणीसाठा ३६.५८ टीएमसी (६८.२८ टक्के) होता. तर, दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५८ हजार ५८५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यात रात्री आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. उजनी धरणात अवघ्या महिनाभरात वजा २२.९६ टक्क्यांवरून उपयुक्त ६८.२८ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ९१ टक्के पाणीसाठा वाढला आहे. पहाटे सहा वाजता धरणात ९६.९६ टीएमसी पाणीसाठा होता. बारा तासांत त्यात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाल्याचे दिसून आले.